नापिकीमुळे वाघोडा गाव काढले विकायला

0
21

वर्धा दि. १८: शेती, जमीन, घरदार विकायला काढल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र जर कुणी तुम्हाला गाव विकायला काढलंय, असं सांगितलं तर? थोडं अजब वाटतंय ना? मात्र हे खरं आहे.जिल्ह्यातीलच कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील ग्रामस्थांनी सततच्या नापिकीला कंटाळून आमचे गाव विकत घ्या किंवा सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली असून त्या आशयाचे फलकही गावाच्या सीमेवर लावले आहेत.
विशेष म्हणजे या गावची लोकसंख्या हजाराच्यावर असून बहुसंख्य गावकरी हे भोयर-पवार समाजातील असल्याने या घटनेचे अखिल भारतीय भोयर पवार महासंघाने याची दखल घेत.महासंघाच्या नागपूर येथील पदाधिकार्यानी वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी यांना सोबत घेऊन आज शनिवारी वाघोडा गावाला भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा केली.यामध्ये अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष नामदेवराव राऊत,कृष्णाजी देवासे,श्रावण फरकाडे,मुकूंद बन्गरे,मधुकरराव चोपडे यांचा समावेश होता.फरकाडे यांनी भाजपच्या शेतकरी आघाडीचे सद्स्य देवराव ढोले यांना सुध्दा या प्रकरणाची माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी पावसाच्या लहरीपणाने शेतकरी अर्धमेला झाला होता.यावर्षी सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पेरण्या समाधानकारक झाल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतातील पीक करपण्याच्या मार्गावर आले. पाऊस नसल्याने जंगलातही जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. पावसाची पाठ, त्यातच भारनियमनाचे दुखणे सुरू झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन एक हजार लोकसंख्या असलेल्या वाघोडा येथील शेतकर्‍यांनी नायब तहसीलदार गणेश बर्वे यांच्यामार्फत शासनाला पाठविले आहे. गाव विकल्यानंतर आम्ही रोजमजुरी करून जगू असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.निवेदनावर वाघोडा येथील शशिभूषण कामडी, प्रल्हाद गिर्‍हाळे, मोहन हजारे, गोवर्धन कामडी, प्रशांत देवासे, राधेश्याम कामडी, देवचंद्र कामडी, सुरेश गिर्‍हाळे, ईश्‍वरदास कामडी, मसराम कामडी, लोकेश कामडी, हरिभाऊ कामडी, मधुकर कामडी, ओंकार कामडी, देवेंद्र बानाईतकर यांच्यासह एकूण १०२ शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.