गोंदिया वनविभागाला तेंदूपाने विक्रीतून मिळणार ९.२३ कोटी

0
19

गोंदिया,दि.१९: वन विभागातील संपूर्ण २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली होती. तेंदूपानांच्या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे पार पडले. या हंगामातील तेंदूपानांच्या घटक विक्रीपोटी शासनाला नऊ कोटी २३ लाख ३७ हजार ७८२ रूपयांचा महसूल प्राप्त होणार असल्याची माहिती वनविभाग सूत्रांनी दिली आहे.

सन २०१५ च्या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम गोंदिया विभागातील क्षेत्रीय कर्मचारी व परवानाधारक यांनी त्यांच्या स्तरावर उत्तम नियोजनातून पूर्ण केले. तेंदूपाने घटक विक्रीपासून मिळालेल्या महसुलातून शासकीय खर्च वजा करून शासनातर्फे मजुरांना शिल्लक रक्कम बोनस स्वरूपात वितरित करण्याचे धोरण आहे.

सद्यस्थितीत गोंदिया वन विभागातील सन २०१२ हंगामातील मजुरांचे बोनस वितरणाचे काम जवळजवळ संपुष्टात आले आहे. तसेच सन २०१३ हंगामातील बोनस वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर सन २०१४ हंगामातील बोनस वाटपाला सुरूवात होणार आहे. तसेच अवघ्या सहा महिन्यांत बोनस वाटपाचे काम पूर्ण करण्याचा गोंदिया वन विभागाचा निर्धार असल्याचे समजते.

सन २०१४ व सन २०१५ या दोन वर्षांचे बोनस वितरण होणे बाकी आहे. तर सन २०१२ हंगामातील ९९.३४ टक्के व सन २०१३ हंगामातील ९४.७२ टक्के मजुरांना बोनस वितरित करण्यात आले आहे. यातील काही मजुरांचा मृत्यू झाला असून तर काही मजुरांची बँकेत खाती नसल्यामुळे त्यांचा बोनस वाटप करणे बाकी असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येते.सन २०१२ व २०१३ मधील ८७ हजार ९८६ मजुरांना १४ कोटी ७७ लाख ४० हजार ९२१ रूपयांचे बोनस वितरित करण्यात आले आहे. सन २०१२ मध्ये बोनससाठी पात्र मजूर संख्या ५० हजार १०७ होती. त्यांना १० कोटी ७३ लाख ५३ लाख ४५५ रूपयांचे बोनस द्यावयाचे होते. यापैकी ४९ हजार ९३६ मजुरांना १० कोटी ६६ लाख ४० हजार १११ रूपयांचे बोनस वाटप करण्यात आले असून त्यांची टक्केवारी ९९.३४ आहे. तर सन २०१३ मध्ये बोनससाठी पात्र मजूर संख्या ३९ हजार ०९० होती. त्यांना चार कोटी ३३ लाख ९१ हजार ५६१ रूपयांचे बोनस वाटप करावयाचे होते. यापैकी ३८ हजार ०५० मजुरांना चार कोटी ११ लाख ८१० रूपयांचे बोनस वाटप करण्यात आले असून याची टक्केवारी ९४.७२ एवढी आहे.

तेंदूपान संकलनाच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होत असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो. मात्र यात त्यांच्या जिवीतालाही धोका निर्माण होत असल्याचे प्रकार घडतात. यामुळे मजुरांनी प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत आपल्या नावे बँक खाते उघडावे व त्याबाबत माहिती परिक्षेत्र कार्यालयात द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.
तेंदूपाने संकलन करणे, पुडे सुकविणे, पाणी शिंपणे, बोद भराई करणे आदी संपूर्ण कामांसाठी मजुरांना सुमारे आठ कोटी रूपये मजुरी परवानाधारकांमार्फत वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे मजूरांच्या कुटुंबांना उन्हाळ्याच्या दिवसांत या मजुरीच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक आधार प्राप्त झालेला आहे.