समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री

0
11

नागपूर दि. ९: : समाजातील अनेक वर्षे शोषित-वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच सामाजिक व आर्थिक विकासासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींना शाहू-फुले, आंबेडकर तसेच थोर समाजसुधारकांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरव करतांना या संस्थांची जबाबदारी अधिक वाढली असून वंचितासाठी सुरु केलेली लढाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरु ठेवा. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाला सर्वोच्च् प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रविण दटके, आमदार सर्वश्री प्रकाश गजभिये, नागो गाणार, प्रा.अनिल सोले, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, मल्लिकार्जुन रेडडी, सुधाकर कोहळे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, समाज कल्याण आयुक्त रणजित सिंह देओल तसेच बार्टीचे संचालक श्री.परिहार, अपंग कल्याण आयुक्त नरेंद्र पोयाम आदी उपस्थित होते.

समाजातील दलित शोषित समाजाच्या सर्वांगीण विकासासोबतच शैक्षणिक व आर्थिक विकासाला प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील गोर गरीब जनतेपर्यंत किती विकास पोहोचला याचे मुल्यमापन करतांना विकासापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रभावी व परिणामकारक योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. या प्रकियेमध्ये समाजाच्यासाठी विकासाचे कार्य करणारे संस्थाचेही सहभाग महत्त्वपूर्ण असल्यामुळेच वंचित, उपेक्षित आणि शोषितांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीं संस्थाचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील वंचितासाठी पथदर्शी काम करणाऱ्या व्यक्तिंना व संस्थाना पुरस्कार मिळाल्यानंतर या संस्थाची जबाबदारी अधिक वाढली आहे. सामाजिक कार्य करणाऱ्यासाठी या संस्था आदर्श ठरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्व महापुरुषांसह विविध क्षेत्रातील थोर समाज सुधारकांच्या विचारांचे आदर्श ठेऊन स्वतंत्र्य, समता व बंधुता या सामाजिक न्याय तत्वाचे संवर्धन करण्यासाठी शासन कटीबद्ध असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच लंडन येथील डॉ.बाबासाहेब यांचे वास्तव्य असलेले घर स्मारक म्हणून जतन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जागतिकदृष्ट्या अर्थशास्त्र कसे असावे यासाठी डॉ.बाबासाहेब यांच्या नावाने लंडन स्कूलमध्ये अध्यनकक्ष सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्री.गडकरी यांनी आपले संपूर्ण जीवन शोषित पिडीतांसाठी अर्पण केले अशा संस्था व व्यक्तिंचा गौरव हा समाजासाठी महत्त्वाचा असून शिक्षणाचा प्रसार व आर्थिक विकास यांच्या समन्वयातून सर्वांगीण विकासाचे ध्येय पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

श्री. बडोले यांनी दलित शोषित समाजाला पुढे नेण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटीबद्ध असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारावर आधारित समाज निर्माण करणाच्या प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. कांबळे यांनी समाजात सामाजिक समता निर्माण करणाऱ्या संस्था व समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तिंचा शासनातर्फे यथोचित गौरव करतांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाची गैरव्यव्हार दूर करुन ते महामंडळ 15 ऑगस्ट पासून सुरु करण्याचा मानसही व्यक्त केला.

प्रारंभी दीप प्रज्वलित करुन तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये शाल श्रीफळ व रोख रक्‍कमेचा समावेश आहे.

शाहू, फुले, आंबेडकर, पारितोषिकासाठी निवड केलेल्या संस्था-
भिक्कू संघाज युनायटेड बुद्धीष्ट मिशन, सर्वेादय बुद्ध विहार,मुंबई, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे फर्ग्युसन महाविद्यालय आवार शिवाजीनगर पुणे, प्रबोधिनी ट्रस्ट, मानसिक अपंगांच्या विकासासाठी काम करणारी संस्था नाशिक, वनवासी सेवा समिती जामोद जि.बुलढाणा, विवेकानंद मेडीकल फाऊंडशन रिसर्च सेंटर औरंगाबाद, कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था नागपूर.

अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी निवड केलेल्या संस्था-
अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमी, रेल्वेस्टेशन मागे, गोधनी रेल्वे, अण्णाभाऊ साठे ह्युमन ॲण्ड कर्ल्चरल सोसायटी नांदेड, जोशाबा शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवक मंडळ कोल्हापूर, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोक कला मंडळ किल्लारी ता. औसा.

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कारासाठी निवड केलेल्या संस्था-नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक.

संत रविदास पुरस्कारासाठी निवड केलेल्या संस्था महाराष्ट्र चर्मकार परिषद, अवधूत को- ऑपरेटीव्ह सोसायटी, नांदेड.

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कारासाठी निवड केलेली व्यक्ती
नटवरलाल रघुनाथ खरे, मुंबई. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी निवड केलेले व्यक्ती यशवंत रामचंद्र भिसे पुणे, दत्ताबापू यशवंत काळुके बीड, लहानु तात्याबा नाडे औरंगाबाद, रामचंद्रप्पा गायकवाड उस्मानाबाद, श्रीमती मुक्ताबाई हरिशचंद्र दुंडे गोंदिया, बाजीराव शिंदे पुणे, प्रभाकर लिंबाजी शिरसाठ मुंबई, उत्तम माधवराव लहुबंदे मुंबई, श्रीमती साखराबाई गेणु बगाडे ठाणे, युवराज बाबुराव मगदुम ठाणे, रमेश लक्ष्मण वैरागर नाशिक, संभाजी रामा कांबळे नाशिक, श्रीकांत दशरथ साठे अहमदनगर, रामचंद्र बुधा पाखरे जळगांव, प्रल्हाद मल्हारी कांबळे पुणे, शांताराम धोंडीबा जोगदंड पुणे, संजय वामनराव शेजवळ औरंगाबाद, सौ. यशोदाबाई नारायण कोरडे हिंगोली, कृष्णा मारोती वानखेडे नागपूर, शंकर रजन्या वानखेडे नागपूर, दिगंबर रामाजी घंटेवाड नांदेड, श्रीमती छायाबाई गणपतराव घोरपडे लातूर, वामन श्रीपद आमटे चंद्रपूर.

संत रविदास पुरस्कारासाठी निवड केलेले व्यक्ती-
बाळकृष्ण मधुकर कांबळे ठाणे, श्रीमती सरोज बिचुरे मुंबई, भरत गणपत कारंडे पुणे, ईश्वरदास सुकाजी सोनवाने भंडारा, लिलाधर कानोडे नागपूर.