स्वातंत्र्याची फळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा संकल्प करु या – मुख्यमंत्री फडणवीस

0
44

नागपूर दि. ९: स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतिकारकांनी बलिदान देऊन जे स्वातंत्र्य आम्हाला दिले,त्या थोर क्रांतिकारकांना मानवंदना अर्पण करतांना स्वातंत्र्याचे मोल काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी शहीद स्मारकास भेट देऊन त्यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने नागपूर शहराने जिल्ह्यातील 100 क्रांतिकारकांच्या बलिदानाचे व आजच्या युवा पिढीला करुन देणाऱ्या शहीद स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. मुख्यमंत्र्यांनी क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात बलिदान दिलेल्या सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांना मानवंदना अर्पण केली.

मॉरीस कॉलेज, टी पॉईंटजवळ आयोजित शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, खासदार विजय दर्डा, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, प्रकाश गजभिये, अनिल सोले, ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे, माजी आमदार व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यादवराव देवगडे, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रविंद्र भोयर, रमेश सिंगारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते.

थोर क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याची फळे आपण उपभोगत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतांना थोर स्वातंत्र्य सैनिकांनी शहीद होतांना स्वातंत्र्याचे मोल समजेल किंवा नाही याचा विचार केला नाही. त्यामुळे हे स्वातंत्र्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून मिळाले. त्या स्वातंत्र्याची फळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा संकल्प करुन स्वातंत्र्य अबाधित ठेवू या, असेही त्यांनी सांगितले.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत तसेच अविकसित भागापर्यंत लोकोपयोगी कामे पोहचविण्याचे काम तसेच समाजातील प्रत्येक कुटुंबाला निवारा, विकास पोहचविण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने काम करावे,असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. गडकरी यांनी शहीद स्मारक हे भविष्यातील पिढीला प्रेरणा देणारे स्मारक ठरणार असून नागपूर शहर व जिल्ह्यातील 100 क्रांतिकारकांचे नावे व इतिहास असलेले हे स्मारक नागपूर शहराचा चालता बोलता इतिहास आहे. या स्मारकामुळे शहराचा गौरवशाली इतिहास देशासमोर आला असून देशासाठी चांगले कार्य करण्याची प्रेरणा या स्मारंकामुळे जनतेमध्ये जागृत होईल.

सीताबर्डी येथील संरक्षण विभागाच्या जागेवर मोठा धबधबा व सुंदर वास्तू निर्माण करण्यासाठी संरक्षण विभागाने मान्यता दिली असून नागपूर सुधार प्रन्यासने नागपूर शहरासाठी भूषण ठरणारी वास्तू येथे निर्माण करावी, अशी सूचनाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

आमदार श्री. देशमुख यांनी क्रांतिकारकांचे स्मरण करतांना झिरो मैल परिसरासाठी विकास करावा अशी सूचना केली. ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी हिंदुस्थानी लाल सेनेतर्फे आदरांजली वाहतांना 26 नोव्हेंबर 1817 रोजी घडलेल्या घटनेची आठवण करुन दिली. तसेच आप्पासाहेब भोसले यांनी सीताबर्डीची लढाई लढली. अशा या संवेदनशील शहराने देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे सांगितले.

नागपूर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या थोर क्रांतिकारकांची आठवण म्हणून शहीद स्मारक निर्माण करण्यासाठी निर्णय झाला होता. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे एक वर्षात स्मारकाची निर्मिती केली असून भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आठवण भावी पिढीला कायम राहणार आहे. महात्मा गांधी यांनी भारत छोडो व करो वा मरोचा नारा दिला त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील थोर क्रांतिकारकाने या लढ्यात सहभाग दिला. यामध्ये 82 क्रांतिकारक शहराची तर युवा क्रांतिकारक शहराबाहेरील आहेत. त्यांच्या नावासह नागपूर स्वातंत्र्याचा इतिहास शहीद स्मारकाच्या माध्यमातून जनतेला होणार असल्याचे प्रास्तविकात सभापती श्याम वर्धने यांनी सांगितले.

यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुंडलिकराव जवंजाळ, ॲड. चांदुरकर, विठ्ठलराव भोळे यांचा मुख्यमंत्र्यांनी शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला. सुनीतकुमार आतिष यांनी शहीद क्रांतिकारकांना मानवंदना अर्पण करुन गीत सादर केल्यानंतर सभापती श्याम वर्धने व अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार यांनी स्वागत केले. श्रीमती रेणुका देशकर यांनी सूत्रसंचलन केले तर आभार अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार यांनी मानले.