अनुकंपा तत्वावर आता ग्रामसेवक पदाचीही नोकरी- ग्रामविकास मंत्री

0
26

मुंबई दि.२०-: जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र उमेदवारास आता अनुकंपा तत्वावर ग्रामसेवक या पदावरही नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र उमेदवारास अनुकंपा तत्वावर वर्ग ३ व ४ च्या पदावर नियुक्ती देण्यात येते. याअंतर्गत आतापर्यंत क्लार्क किंवा शिपाई या पदांवरच नियुक्ती दिली जात असे. पण आता याची कक्षा वाढविण्याचा निर्णय झाला असून मृत कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबियास ग्रामसेवक या पदावरही नियुक्ती देण्यात येणार आहे.

आतापर्यंत अनुकंपा तत्वावरील पदांची संख्या मर्यादीत असल्यामुळे प्रतिक्षा यादी मोठी होती. पण आता अनुकंपा तत्वावर पात्रताधारकास ग्रामसेवक पदाचीही नोकरी मिळणार असल्यामुळे ही प्रतिक्षा यादी कमी होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे अडचणीत सापडलेल्या पात्र कुटुंबियास लवकर नोकरी मिळणे शक्य होईल, असे त्या म्हणाल्या.
जिल्हा परिषदांमध्ये शिक्षणसेवक तसेच कृषीसेवक या पदांवरही अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा विचार सुरु आहे. शिक्षण विभाग तसेच कृषी विभागाशी चर्चा करुन यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.