मुंडे यांच्या सकारात्मक चर्चेनंतर ग्रामसेवकांचे आंदोलन मागे

0
7

मुंबई दि. २९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासंबंधात ग्रामसेवकांचे गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेले काम बंद आंदोलन ग्रामविकास, रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांच्या सकारात्मक चर्चेनंतर संघटनेने मागे घेतल्याचे पत्र दिले.

श्रीमती मुंडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत संघटनेने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी ग्रामविकास व रोहयोचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, उप सचिव आर.विमला, अवर सचिव श्री. काळे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्यासह रोहयोचे वरिष्ठ अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, राज्याच्या काही भागात दीर्घ कालावधीपासून पावसाने ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामसेवकांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करावेत. नरेगाअंतर्गत जवळपास 40 प्रकारची कामे शक्य आहेत. यात अनेक वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपाची कामे आहेत. ही कामे घेतली तर निश्चितच गावांचा विकास होऊ शकेल, त्यातही जलसंधारण व जलसंवर्धनाच्या कामावर भर दिला तर दुष्काळाच्या कामावरही मात करता येईल.

गावांचे दळणवळणाचे महत्वाचे साधन रस्ते असल्यामुळे टंचाईग्रस्त भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत स्मशानभूमी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यासह गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे. रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव विकासाची कामे करण्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामसेवकांनी विविध मागण्या केल्या होत्या, त्यापैकी काही मागण्या तपासून कार्यवाही करण्यात येईल. तसेच इतर मागण्यांसाठी शासन सकारात्मक असून संबंधित विभागाशी चर्चा करण्यात येईल. तसेच दोन महिन्यात आढावा बैठक घेऊन इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही श्रीमती मुंडे यांनी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.