पर्यटनाच्या वाढीसाठी महाराष्ट्र सज्ज- मुख्यमंत्री

0
10

मुंबई दि. २९ : महाराष्ट्राला जागतिक वारसा लाभला असून, महाराष्ट्राची संस्कृती जगाला हेवा वाटावी अशी आहे. या संस्कृतीचे दर्शन जगाला घडावे, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी खाजगी गुंतवणुकीला चालना देण्यात येणार असून, त्यासाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ महत्वपूर्ण भूमिका निभावेल. या मार्टच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटनाच्या विकासासाठी सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील जे.डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल येथे ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रसार प्रकल्पानिमित्त सोमवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ.महेश शर्मा, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन राज्यमंत्री प्रा.राम शिंदे, खासदार पूनम महाजन, आमदार पराग अळवणी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, सह महाव्यवस्थापक सतीश सोनी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे, यासाठी विविध परवानग्यांची संख्या 25 वरुन 6 करण्यात येऊन लघुपट किंवा चित्रपट निर्मिती करु इच्छिणाऱ्यांना एक दिवसात परवानगी मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे ‘इव्हेंट डेस्टिनेशन’ होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, नवीन पर्यटन धोरणात खासगी गुंतवणुकीला चालना देण्यात येईल. देशातील पहिले स्कूबा डायव्हिंग सेंटर सिंधुदुर्ग येथे सुरु झाले आहे. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्यात दोन कोटी भाविकांनी भेट दिली; पण कुठेही गैरव्यवस्था झालेली नाही. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन जगाला व्हावे, असा शासनाचा प्रयत्न आहे. या कुंभमेळ्याला ‘हरित कुंभ’ असे स्वरुप देण्यात आले. महाराष्ट्रातील गड, किल्ले, समुद्रकिनारे, लेणी, धार्मिक स्थळे असे सांस्कृतिक वैभव जगभरातील पर्यटकांपुढे यावे यासाठी हा उपक्रम निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. शर्मा यावेळी म्हणाले की, भारत हा सक्षम व सुरक्षित देश असून, दरवर्षी परदेशातून 77 लाख पर्यटक येतात. त्यापैकी 44 लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात. पर्यटनातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. त्याद्वारे मुबलक प्रमाणात रोजगार निर्मितीही होते. महाराष्ट्र हे देशातील पर्यटन वृद्धीसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे, असा शब्दात डॉ. शर्मा यांनी राज्याचा गौरव केला.

श्री. बच्चन म्हणाले की, मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे. पर्यटनाच्या वाढीसाठी माझे शासनाला नेहमीच सहकार्य असेल. भारताला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांत ‘ताजमहाल बघणारे’ व ‘ताजमहाल न बघणारे’ असे दोन प्रकार असतात, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी म्हटल्याचे सांगून श्री. बच्चन म्हणाले की, क्लिंटन यांच्या वाक्यात थोडा बदल करुन मी असे म्हणेल की, परदेशी पर्यटकांची विभागणी ‘महाराष्ट्राला भेट देणारे’ व ‘महाराष्ट्राला भेट न देणारे’ अशी करता येईल.

मुंबई ही पर्यटन क्षेत्रातील बादशहा असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले. राज्याची संस्कृती जगभर नेण्यासाठी ‘मार्ट’चा उपक्रम उपयुक्त ठरेल, अशी आशा श्री. शिंदे यांनी व्यक्त केले. श्रीमती सिंह यांनी उपक्रमाची माहिती दिली. पर्यटन विकास महामंडळाच्या ‘वाईल्ड लाईफ’ व ‘महाएक्सप्लोरर’ या मोबाईल ॲपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. ‘महाराष्ट्रातील 100 पर्यटन स्थळे’, ‘कॉफीटेबल बुक ऑफ नाशिक’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. जैन यांनी प्रास्ताविक केले. श्री. सोनी यांनी आभार मानले.