जेष्ठ वकील श्रीहरी अणे यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती

0
12

मुंबई-दि.14- राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला देणाऱ्या महाधिवक्तापदावर (ऍडव्होकेट जनरल) विदर्भातील जेष्ठ वकील श्रीहरी अणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी जून महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. सुनील मनोहर हे सुद्धा विदर्भातील नागपूरमधील प्रसिद्ध वकील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असल्याने त्यांनी पुन्हा एकदा विदर्भातील महाधिवक्ताची नियुक्ती केली आहे.

श्रीहरी अणे हे जेष्ठ वकील असून, राज्य सरकारची ते भक्कमपणे बाजू मांडत आले आहेत. फडणवीस सरकार अल्पमतात असताना त्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर श्रीहरी अणे यांनी बाजू मांडली होती. त्यामुळे ती याचिका रद्द झाली होती. सुनील मनोहर यांनी वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिला होता. तो राज्य सरकारने स्वीकारला होता. नोव्हेंबर २०१४ ते जून २०१५ पर्यंत मनोहर यांनी हे महाधिवक्ता म्हणून काम पाहिले. नवीन महाधिवक्त्यांची नियुक्ती होईपर्यंत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता. अखेर चार महिन्यांनी श्रीहरी अणे यांची महाधिवक्तापदी नियुक्ती फडणवीस सरकारने केली आहे.