ग्रामसेवकांच्या मागण्यांवर अभ्यास करुन सकारात्मक निर्णय घेणार- पंकजा मुंडे

0
7

मुंबई दि.२२- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या मागण्यांवर अभ्यास करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ग्रामविकास, रोहयो, जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मंत्री महोदयांच्या दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या मागण्यासंदर्भात आयोजित बैठकीत श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही.गिरीराज, उपसचिव अनिल कुलकर्णी, विजय शिंदे, व्ही. व्ही. गुजर यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे आदी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, ग्रामसेवकांच्या काही मागण्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणे गरजेचे आहे. प्रवास भत्त्यासंदर्भात कृषी सहाय्यक, तलाठी यांच्यासंदर्भात काय निर्णय झाला आहे. त्यांचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल.

तसेच ग्रामसेवकांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवा काळ नियमित करणे, ग्रामसेवकांची कार्यसूची नव्याने तयार करणे, बदल्यांच्या नियमात बदल करणे, ग्रामसेवकांवर होणाऱ्या कारवाईसंदर्भातही १७ जून २०१३ च्या पत्राबाबत निर्णय घेणे आदी मागण्यासंदर्भात अभ्यास करुन निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या श्रीमती मुंडे यांच्याकडे मांडून ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनांची अंमलबजावणी करणे सुकर व्हावे यासाठी मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंतीही संघटनेकडून करण्यात आली.