निवासी वैद्यकीय अधिकारी वसतिगृह बांधकामाबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

0
19

मुंबई, दि. 20:  नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुमारे 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मापदंडानुसार आवश्यक असा वसतिगृह बांधकामबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने तयार करून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला पाठवावा अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील अद्ययावत सुविधासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार प्रकाश गजभिये, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक दिलीप म्हैसेकर, यांच्यासह नागपूर शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले, निवासी वैद्यकीय अधिकारी वसतिगृहाच्या बांधकामाबाबतचा परिपूर्ण सादर करण्यात यावा. यामध्ये नेमक्या कितव्या मजल्यावर बांधकाम करण्यात येणार आहे याबाबतचा तपशील, किती वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी बांधण्यात येणार आहे, यासाठी किती खर्च येणार आहे अशी सर्व माहिती प्रस्तावात देण्यात यावी. याशिवाय जुन्या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला असून याबाबतही पाठपुरावा करण्यात यावा.

जिल्हा नियोजन समितीमार्फत 6 लिफ्ट मंजूर करण्यात आल्या असून 4 लिफ्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता आणि 2 लिफ्ट अतिविशेषोपचार रुग्णालयाकरिता येत्या महिन्याभरात कार्यान्वित होतील याकडे लक्ष देण्यात यावे.जिल्हा खनिज निधीतून 3 एम.आर.आय आणि 2 सी.टी स्कॅन मशीन लवकर कार्यान्वित होतील याकडे नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी लक्ष घालावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लवकरच वैद्यकीय शिक्षण विभागासाठी वर्ग 1 आणि वर्ग 2 बाबतची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे तर वर्ग 3 बाबतची भरती वैद्यकीय शिक्षण संचालकामार्फत होणार असून याबाबतची जाहिरातही लवकरच प्रसिध्द होणार आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वर्ग 4 ची काही पदे रिक्त आहेत. मात्र सध्या राज्यात कोविडची परिस्थिती पाहता ही पदे रुग्णालय प्रशासनाने बाह्यस्त्रोताद्वारे भरावी जेणेकरुन रुग्णसेवेत अडचण येणार नाही असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.