लोकसेवा आयोग परीक्षेची वयोमर्यादा वाढणार

0
11

मुंबई –दि.  २४- राज्य लोकसेवा आयोग परीक्षेसाठी खुल्या जागेवरील परीक्षार्थीची वयोमर्यादा वाढवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना 35 ऐवजी 40 तर फौजदार परीक्षेसाठी 28 ची वयोमर्यादा वाढविण्यास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. याबाबतचा शासन आदेश डिसेंबरअखेरपर्यंत काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्रालयात शिवसंग्राम संघटनेच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत. अनेक वर्षे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू होत नाही. त्यामुळे, तरुणांना परीक्षेची वाट पाहावी लागते. यातच अनेक तरुणांचे वय संपल्याने त्यांना संधी पासून वंचित राहावे लागते. त्यामुळे, खुल्या प्रवर्गातील अनेक तरुणांमधे राज्य लोकसेवा आयोगाच्या वयोमर्यादेत बदल करावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यासाठी पुणे येथे जाहीर मेळावा घेऊन सरकारला विनंतीदेखील करण्यात आली होती. त्यानुसार, आज शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाला फडणवीस यांनी भेट दिली.

यापूर्वीही अनेक वेळा परीक्षांचा कालावधी वर्षानुवर्षे लांबल्याने वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना 30 वरून 33 अशी अट घालण्यात आली होती.