पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम – सुनील तटकरे

0
13
मुंबई – सलग पन्नास वर्षे देश आणि राज्याच्या राजकारणासह इतर सर्वच क्षेत्रांत कामाची छाप पाडणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अमृतमहोत्सवी वर्ष धुमधडाक्‍यात साजरे करण्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केली.

राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांनी ही माहिती दिली. राजधानी दिल्लीपासून राज्यातील विविध गावांमध्ये यानिमित्ताने सामाजिक कार्यक्रम, खेळ, क्रीडा, आरोग्य शिबिरे, शेतकरी मेळावे अशा विविध उपक्रमांचे पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन करण्यात आले असल्याचे तटकरे यांनी सांगितले. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत हे कार्यक्रम होणार आहेत.

दिल्लीत 10 डिसेंबर रोजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पवार यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पवारांनी दिलेले योगदान, त्यामुळे देशाने केलेली प्रगती आणि विकास यांचा मागोवा घेणारा गौरवग्रंथ या वेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय स्वरूपाचा असून, विशेष निमंत्रितांसाठीच तो राखीव ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर 12 डिसेंबर रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत विविध स्तरांतील मान्यवर व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वतः पवार स्वीकारणार आहेत. तर त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता नेहरू सेंटर येथे “राष्ट्रवादी‘च्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली. या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या दोन्ही भव्य कार्यक्रमांनंतर 20 डिसेंबर रोजी पुणे येथे “राष्ट्रवादी‘च्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातील पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुस्तक पाच भाषांत 
शरद पवार यांच्या 75 वर्षातल्या महत्त्वाच्या 75 घटना व घडामोडींचा मागोवा घेणाऱ्या “आधारवड‘ या पुस्तकाचे पाच भाषांत प्रकाशन करण्यात येणार आहे. हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू आणि मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. अत्यंत मोजक्‍या, पण महत्त्वाच्या घटनांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. त्यासोबतच पवार यांची राजकीय निर्णयक्षमता, प्रशासक म्हणून त्यांची खंबीर प्रतिमा आदी पैलूंचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.