पत्रकार संरक्षण कायदा लवकरच- देवेंद्र फडणवीस

0
13

मुंबई –  पत्रकारांना संरक्षण देण्यासाठीचा मसुदा तयार करून त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य सरकारच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात पत्रकारांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्‍न, आरोग्य विमा आणि पत्रकारांची सामाजिक सुरक्षा याबाबतही सकारात्मक निर्णय घेणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हे पुरस्कार केवळ औपचारिकता नसून, हा पत्रकारांच्या सकारात्मक कार्याचा गौरव आहे. पत्रकार अलिखित नियम पाळून लोकशाही बळकट करतात, म्हणूनच त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. डॉ. मुझफ्फर हुसेन यांनी पत्रकारितेतून मुस्लिमजगताचे अंतरंग मांडले आहे. त्यांची पत्रकारिता नेहमीच देशाच्या परराष्ट्र धोरणाला पूरक राहिली आहे. सध्या समाज माध्यमांनी (सोशल मीडिया) प्रत्येकाला पत्रकार केले आहे. मात्र त्याचा वापर योग्य प्रकारे होणे आवश्‍यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्य प्रवाहातील माध्यमे कायद्याने जे प्रसिद्ध करू शकत नाहीत, ते समाज माध्यमांवर टाकल्याने अनेक गैरसमज होतात. येत्या काळात स्वच्छ भारत अभियानाबद्दल जनजागृती करणाऱ्या पत्रकारांनाही पुरस्कार देण्यात येतील, असेही ते म्हणाले.