अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच

0
9
नवी दिल्ली (पीटीआय) – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्येच वास्तव्यास आहे. तो स्वत: वेळोवेळी आपल्या स्थानांमध्ये बदल करत लपून बसला असल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेमध्ये दिली. विविध गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद पाकिस्तानातच असल्याचे स्पष्ट होते, असे गृहराज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी यांनी लोकसभेत सांगितले. भारत दाऊदबाबत वेळोवेळी पाकिस्तानच्या यंत्रणेशी चर्चा करत असून त्याचा पासपोर्ट, पत्ता हेदेखील आम्ही पाक सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. दाऊदवर दहशतवादी कृत्यांप्रकरणी खटला भरता यावा म्हणून त्याला आमच्याकडे हस्तांतरित केले जावे, अशी विनंती आम्ही पाक सरकारकडे केल्याचे त्यांनी नमूद केले. गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही दाऊदला भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

देशातील 257 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्या केंद्राच्या यादीमध्ये 257 जणांचा समावेश असून, यामध्ये केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच राज्य मंत्र्यांचाही समावेश आहे, असे चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा फार थोड्या तरुणांवर प्रभाव असून तपास संस्था या संघटनेच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या संघटनेच्या ऑनलाइन कारवायांवरदेखील संघटनेचे बारीक लक्ष असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी नमूद केले.