जातीय हिंसाचाराच्या घटनात वाढ – केंद्रीय गृहराज्यमंत्री

0
7

 

नवीदिल्ली- देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये वाढ झाली असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले. मात्र, त्याचवेळी २०१३ च्या तुलनेत २०१५ या घटनांमध्ये घट झाली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरण रिजीजू म्हणाले, २०१४ मध्ये मे महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यावर्षाच्या तुलनेत २०१५ मध्ये जातीय हिंसाचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. मात्र, २०१३ या वर्षाशी तुलना केली असता, चालू वर्षात या घटनांमध्ये घट झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या विषय असून, राज्य सरकारला आवश्यक असलेली सर्व मदत केंद्र सरकारकडून केली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपचे वर्चस्व असलेल्या भागांमध्येच जातीय हिंसाचाराच्या घटना का वाढताहेत, असा प्रश्न मल्लिकार्जून खर्गे यांनी विचारला. बिहार, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्ये जातीय हिंसाचाराच्या घटना जास्त आहेत. त्यातुलनेत पश्चिम बंगाल, केरळमध्ये या घटनांचे प्रमाण कमी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. किरण रिजीजू यांनी हा आरोप फेटाळून लावला.