पंचायत समितीच्या सभांवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

0
10

गटविकास अधिकाऱ्यांचा जाचः संघटनेचा आरोप

देवरी- तालुक्यातील ग्रामसेवक युनियनने गटविकास अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पंचायत समितीद्वारे बोलावण्यात येणाऱ्या पाक्षिक आणि मासिक सभांवर समस्या दूर होईस्तोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
काल (ता. ३) झालेल्या तालुक्यातील ग्रामसेवक युनियनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष विनोद श्रीवास्तव यांनी सांगितले. ग्रामसेवक संघटनेच्या बैठकीत मग्रारोहयोमधील कुशलकामांची देयके दोन दोन वर्षे अडवून ठेवणे, आदेशातील तरतुदींचे उल्लंघन करून प्रशासकीय खर्चाची अर्धा टक्का रक्कम ३ वर्षापासून न देणे, क्षुल्लक कारण देत ग्रामपंचायतींचे खाती गोठविणे, लहानसहान कारणांवरून तपासणीचा सतत ससेमिरा लावणे, ग्रामसेवकांना मानसिक त्रास देण्याच्या हेतूने त्यांच्या पदस्थापनेत वारंवार बदल करून १५ किलोमीटर लांब अंतरावरील ग्रामपंचायतींचा प्रभार देणे, विस्तार अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामसेवकांना हीन वागणूक देणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. पुढे जोपर्यंत ग्रामसेवकांवरील हा अन्याय वरिष्ठ अधिकारी दूर करणार नाही, तो पर्यंत तालुक्यातील सर्व ग्रामसेवक पंचायत समितीमार्फत बोलावण्यात येणाऱ्या मासिक व पाक्षिक सभांवर बहिष्कार टाकतील, असा निर्णय संघटनेने घेतल्याचे कळविले आहे. या बैठकीला अध्यक्ष विनोद श्रीवास्तव, सचिव रवी अरखराव, एस सी तागडे, एस डब्ल्यू बंसोड, घरत. उपवंशी, चारथळ, दमाहे, कढव, मेश्राम, वैद्य, मानापुरे, पटले, नागलवाडे, चव्हाण, कटरे आदी ग्रामसेवक उपस्थित होते