साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन शरद पवारांच्या हस्ते

0
9
 15 जानेवारीला ग्रंथदिंडी; तीन दिवस भरगच्च कार्यक्रम 
पिंपरी-चिंचवड- उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये यंदाचे 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांशी मुक्त संवाद, वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथदिंडी, नामवंत लेखकांच्या प्रकट मुलाखती, माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार अशा भरगच्च कार्यक्रमांची संमेलनात रेलचेल आहे. संमेलनाचे उद्‌घाटन 16 जानेवारीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ हिंदी कवी व गीतकार गुलजार या वेळी उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या पूर्वसंध्येला 15 जानेवारीला ग्रंथदिंडी काढण्यात येईल. या दिवशी 13 माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार केला जाईल. या संमेलनात तरुणांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 16 जानेवारीला उद्‌घाटन होईल. तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत होणार आहे. या दिवशी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा “संगीत रजनी‘चा कार्यक्रम होईल. त्यानंतर 18 जानेवारीला तरुणांना सर्वाधिक प्रिय असलेले लेखक चेतन भगत यांची मुलाखत होईल. या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत. संमेलनात ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या साहित्यिकांशी संवाद साधण्यात येईल. त्यांच्या ध्वनिमुद्रित मुलाखती ऐकवण्यात येतील; तसेच मुक्त संवादही होईल.

संमेलन सर्वसमावेशक व्हावे यासाठी विविध भागांतील वाचकांशी संवाद साधण्यात येत आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले उपस्थित होते. कवी कट्टा, व्यंगचित्र प्रदर्शन, सेल्फी पॉईंट, साहित्यिक – वाचक संवाद कट्टा, अशोक हांडे यांचा “मराठी बाणा‘ असा भरगच्च कार्यक्रम या संमेलनात असेल.