लोकबिरादरी प्रकल्पाचा ४२ वा वर्धापनदिन साजरा

0
13

गडचिरोली ,दि.२३: कर्मयोगी बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या व पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या अविरत सेवेने पुनित झालेल्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा ४२ वा वर्धापनदिन आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

गडचिरोली जिल्हयाच्या पूर्वेला छत्तीसगडच्या सीमेलगत भामरागडच्या निबीड अरण्यात ४२ वर्षांपूर्वी २३ डिसेंबर १९७३ ला कर्मयोगी बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. अज्ञान, अंधश्रद्धा, मागासलेपणा, निरक्षरता यांच्या गर्तेत सापडलेल्या आदिवासींना प्रकाशमान करण्यासाठी डॉ.प्रकाश आमटे लोकबिरादरी प्रकल्पाचे काम हाती घेतले. भोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एमबीबीएस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरु आहे. आदिवासींना, रंजल्या-गांजल्यांना आपुले म्हणणारा, अनाथ, अपंगांना ह्दयाशी धरणारा आणि मुक्या व हिंस्त्र प्राण्यांना प्रेमाची भाषा शिकविणाऱ्या डॉ.प्रकाश आमटे यांनी मागासलेल्या आदिवासींमध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. लोकबिरादरी आश्रमशाळेतून बाराखडी गिरविलेले अनेक माडिया तरुण डॉक्टर, अभियंते, वकील झाले. बाबा आमटे त्यांना डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी सुरु केलेल्या सेवाकार्याचा वसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील डॉ.दिगंत आमटे, अनिकेत आमटे व त्यांच्या सहचारिणी पुढे चालवीत आहेत.

आज ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त दिवंगत बाबा व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी पुणे विद्यापीठातील जर्मन भाषा विभागप्रमुख मंजिरी परांजपे, डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, जगन मचकले, डॉ.विलास तळवेकर, रेणुका मनोहर, शरीफ शेख व पुण्या-मुंबईहून आलेले शेकडो मान्यवर उपस्थित होते.