प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श; मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही विश्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
15

नाशिक, दि.१० – प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यांच्या त्याग भावनेने आज मर्यादा पुरूषोत्तम म्हणून ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज रामनवमीनिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात विधिवत पूजा करून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आमदार राहुल ढिकले, अधिकारी आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले,  श्रीराम हे केवळ दैवत नसून ते एक मर्यादा पुरूषोत्तमही आहेत. लंका जिकूनही त्यांनी ती परत केली, त्यामुळे ते पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत संपूर्ण देशाला एकसंध ठेवणारे भारताचे आदर्श आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधीनीही त्यांना आदर्श मानून आपल्या ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम’ या भजनातून प्रभू श्रीरामांचे महत्त्व अधोरेखित केले आहे, असे सांगून त्यांनी श्रीराम चरित्राचा जेवढा आपण अभ्यास करू तेवढा आपल्या जीवनाचा उत्कर्ष होईल असेही यावेळी सांगितले.

ते म्हणाले, आज रामनवमीच्या या शुभप्रसंगी मला ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शनाचे भाग्य मिळाले, मी स्वत:ला भाग्यवान समजतो.  त्याचबरोबर या प्रभू श्रीरामचंद्रांच्या भूमीतील लोक अधिक भाग्यवान असून ते या पावन भूमीत त्यांचे वारंवार दर्शन घेत असतात, ते त्यांनी निरंतर घेत राहावे. प्रभू श्रीरामांच्या आदर्श आचार-विचारांचा जीवनात आपण सर्वांनी अंगिकार करायला हवा, असे सांगून त्यांनी संपूर्ण राज्याच्या जनतेला रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.