संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बंद केलेले नाही- बबनराव लोणीकर

0
9

विशेष प्रतिनिधी

जालना ,दि.10: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बंद केल्याच्या बातम्या वृत्तपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे आझ प्रसारित झाल्या आहेत. हे अभियान बंद करण्यात आले नसून बदलत्या काळानुसार मूळ योजनेच्या निकषांमध्ये बदल करुन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यभर अधिक व्यापक स्वरुपात राबवले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकारांशी संवाद साधताना  लोणीकर म्हणाले, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही केवळ एक योजना नसून ती महाराष्ट्रात एक लोकचळवळ झालेली आहे. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश गावागावात पोहोचवलेला आहे. त्यांच्या या कार्याची जगाने दखल घेतलेली आहे. सन 2005 ते 2011 या कालावधीत राज्यामध्ये 9 हजार 882 ग्रामपंचायतींना स्वच्छता अभियानाचा पुरस्कार दिलेला आहे. राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत हागणदारीमुक्त करणे, लोकांच्या सवयीमध्ये बदल करणे व या हागणदारीमुक्तीमध्ये निरंतरता आणणे या अनुषंगाने या कामांची तपासणी करण्यात येणार आहे. अपूर्ण कामे केलेल्या गावांना कामे पूर्ण करण्याची संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.