‘मेक इन इंडिया’वर कोटींची उधळण म्हणजे दुष्काळग्रस्तांची थट्टा

0
7

मुंबई दि. ११ –  राज्यातील पंधरा हजार गावांमध्ये दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असताना त्यांना मदत करण्याऐवजी ‘मेक इन इंडिया’वर करोडोंची उधळण का केली जात असल्याचा सवाल केला. एका आठवडय़ात तब्बल ७० ते ८० कोटींची या भपकेबाज आणि खर्चिक पंचतारांकीत कार्यक्रमावर उधळण करणे म्हणजे दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची क्रूर थट्टा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी म्हटले.

मुंबईच्या बीकेसी संकुलात येत्या १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, राज्यात सर्वसामान्य माणसाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असतानाच, मुंबईत मात्र विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली सरकारी खर्चाने पंचतारांकीत सोहळे आयोजित केले जात असल्याबद्दल अहिर यांनी संताप व्यक्त केला. या सोहळय़ाच्या माध्यमातून तब्बल 4 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार आहेत, असा दावा सरकार करत आहे. मात्र, सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत इस्त्राएल, डावोस, जपान, लंडन यासह अनेक देशात दौरे केले. या दौऱयातही हजारो कोटींचे करार केल्याचा दावा भारतात परतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदांमधून केला होता. मात्र, त्यापैकी किती करार प्रत्यक्षात आले आणि त्या माध्यमातून किती परदेशी गुंतवणूक आणि रोजगार उपलब्ध झाले, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, असे थेट आव्हान त्यांनी यावेळी दिले.