समाजातील दिव्यांग घटकाला समानतेची वागणूक द्यावी-राजकुमार बडोले

0
12

राज्यस्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय
क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
नागपूर, दि. ११ : समाजातील दिव्यांग घटकाकडे सहानुभूती आणि दयेच्या दृष्टीने न पाहता त्यांना समानतेची आणि सन्मानाची वागणूक द्या अशी आशा सामाजिक न्याय मंत्री व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन तसेच अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे व स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदान येथे राज्यस्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आज थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, विधानपरिषद सदस्य गिरीष व्यास, स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, अपंग कल्याण आयुक्त नरेंद्र पोयाम, उपायुक्त नितीन ढगे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे तसेच दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशिक्षक, काळजीवाहक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील ३६ जिल्हयातील अपंग शाळा व कर्मशाळेचे ३,५०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील १ हजार ५०० दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले. मान्यवरांच्या स्वागतासाठी ८ ते २५ वर्षे वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी बँड पथकाच्या समवेत पथ संचलन केले. पथसंचालनानंतर राजकुमार बडोले यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंधविद्यालयाच्या चमूने गायत्री मंत्राचे पठन केले. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी खेळाडूंचा शपथविधी सोहळा पार पडला. शासनाने दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धेसाठी १ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रवीण दटके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाकाचे संचालन डॉ. मनोज सालपेकर तर आभार प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांनी मानले.