276 हजेरी सहाय्यकांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन

0
57
रोहयोवरील हजेरी सहाय्यकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा

गोंदिया/मुंबई,दि.01-राज्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर सध्या असलेल्या हजेरी सहाय्यकांना न्यायालयीन निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनबँड 4440-7440 अधिक 1300 रूपये ग्रेड वेतन ही वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकित घेण्यात आला.

रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरी मांडण्यासाठी मजुरांपैकीच एका शिक्षित मजुराची हजेरी सहाय्यक म्हणून 1978 ला निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांना 150 रूपये मानधन देण्यात येत होते. त्यात बदल करून 1989 मध्ये त्यांना 500 रूपये एकत्रित मानधन देण्यात आले. त्यानंतर त्यात सुधारणा होत गेली. यातील जे हजेरी सहाय्यक 26 मे 1993 ते 31 मे 1993 दरम्यान रोजगार हमी योजनेवर कार्यरत होते त्यांना शासनाच्या गट क व गट ड च्या पदावर सामावून घेण्यात आले. उर्वरितांना 750-12-870 द.रो.14-940 ही असुधारित वेतनश्रेणी लागू आहे. हे वेतन तुटपुंजेअसल्यामुळे वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची मागणी होती. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा 276 हजेरी सहाय्यकांना होणार आहे. ही वेतनश्रेणी 1 जानेवारी 2006 पासून पूर्वलक्षीप्रभावाने तसेच त्यांचे वेतन काल्पनिकरित्या निश्चित करून आदेशाच्या दिनांकापासून देय राहील, मात्र, त्यांना 2006 पासूनची थकबाकी देय राहणार नाही. तसेच त्यांना निवृत्ती वेतनासारखे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. जे कर्मचारी अगोदरच निवृत्त झाले आहेत त्यांनाही या वेतनश्रेणीचा कोणताही लाभ मिळणार नाही.