नागपूरच्या आयआयएम, एम्स, अभियांत्रिकी महाविद्यालयास मिहान प्रकल्पातील जमीन

0
24

सवलतीच्या दराने 99 वर्षांसाठी होणार भाडेकरार 

मुंबई/गोंदिया,दि.01-ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि राज्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या नागपुरातील तिन्ही संस्थांना मिहान प्रकल्पातील अनुक्रमे 143, 150 आणि 11.67 एकर जागा सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांसदर्भांतील माहिती दिली असून आता येत्या शैक्षणिक सत्राधी बांधकाम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आयआयएम संस्थेच्या स्थापनेसाठी नागपूर मिहान प्रकल्पाच्या (Non-SEZ) विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील मौजा दहेगाव येथील सेक्टर क्रमांक 20 मधील 143 एकर जमीन तर एम्स संस्थेच्या स्थापनेसाठी याच सेक्टरमधील 150 एकर जमीन 1.5 चटईक्षेत्र निर्देशांकाने देण्यात येणार आहे. आयआयएमसाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयास आणि एम्ससाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयास सवलतीच्या दराने 99 वर्षाच्या कालावधीसाठी ही जमीन देण्यात येणार आहे. तसेच नागपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी मिहान येथील सेक्टर 27 येथील खापरी मधील सुमारे 11.67 एकर जमीन त्यावरील बांधकाम (आय.टी.आय. वसतिगृह व लगतचे मोकळे क्षेत्र त्यावरील शाळेच्या बांधकामासह) आणि मैदान यांच्यासह सवलतीच्या दराने 99 वर्षांच्या कालावधीसाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागास हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व मालवाहतूक हब विमानतळ (मिहान) तसेच विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) विकसित करण्यासाठी विविध कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मिहान प्रकल्पाची व्याप्ती आणि भविष्यात होणारी भरभराट विचारात घेऊन केंद्र शासनातर्फे या ठिकाणी आयआयएम आणि एम्स यासारख्या देशपातळीवरील नामांकित संस्था स्थापन करण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत.