मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाविरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
16

सिरोंचा, दि.८: तेलंगणा सरकारद्वारे प्रस्तावित मेडिगट्टा-कालेश्वर धरणासंदर्भात तेलंगणा व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आजच करार झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन धरणाला प्रखर विरोध दर्शविला.शिष्टमंडळात मधुसुदन आरवेल्ली, सतीश भोगे, गागापुरपू नागेश्वर, एम.ए.रहीम, आकुला मल्लिकार्जुन, कोमरे व्यंकन्ना, सिंरंगी लक्ष्मण, पिष्ठला श्रीनिवास, दुर्गम नारायण, समीर अरगेलवार, फाजील पाशा मोहम्मद, शाम रंगुवार, शाम व्यास, रुद्रशेट्टी कोंडय्या आदींचा समावेश होता.

तेलंगणा सरकारद्वारे पोचमपल्ली येथे मेडिगट्टा-कालेश्वर धरण बांधण्यात येणार आहे. या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील २२ गावांमधील सुपिक शेतजमीन पाण्याखाली बुडणार आहे. शिवाय या धरणामुळे केवळ तेलंगणा राज्यालाच पूर्णपणे फायदा होणार आहे. सिरोंचा तालुक्यातील शेती पाण्यात बुडणार असल्याने सुमारे १८ हजार शेतकऱ्यांच्या हातातील उत्पन्न जाईल, अशी स्थिती असून, बाजारपेठही थंडावणार आहे. अशा स्थितीत आज तेलंगणाचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एका करारावर स्वाक्षरी केली. ही स्वाक्षरी होताच आज नागरिकांनी तत्काळ प्रतिक्रिया देत धरणाला विरोध करणारे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.