शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
5

नागपूर, दि. 21: राज्यातील शाहिरांच्या समस्यांची शासनाला जाणीव असून त्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन आलेल्या महाराष्ट्र शाहिर परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना श्री.मुनगंटीवार म्हणाले की,महाराष्ट्राच्या संस्कृतीत शाहिरांचे मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचा इतिहास गावागावात लोकांच्या मनात जीवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले आहे. अशा शाहिरांकडे शासन दुर्लक्ष करणार नाही. मात्र अनुदानाच्या मदतीवर शाहिरांनी अवलंबून राहू नये तर त्यांना काम देता यावे असा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या प्रसिद्धी प्रसाराच्या कामी शाहिरांची कला कशी वापरता येईल याची चाचपणी करीत आहोत असे त्यांनी शाहिरांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितले.राज्यातील कलाकारांचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत असेही श्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह महाराष्ट्र शाहिर परिषदेचे हितचिंतक संजय बजाज, महाराष्ट्र शाहिर परिषदेचे पदाधिकारी शाहिर  राजेंद्र बावनकुळे,  भगवान लामजेवार, ज्ञानेश्वर मांढरे, अंबादास नागदिवे, नरहरी वासनिक,दीपमैला मालेकर, गणेश देशमुख, अरूण मेश्राम, पत्रकार खंडूराज गायकवाड हे उपस्थित होते.