‘महाज्योती’ला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून ओबीसी-व्हिजेएनटी मुलांचे हक्क हिरावून घेऊ नका ! नाना पटोले

0
5

‘ज्ञानदीप’ संस्थेला तिप्पट शुल्कवाढ देण्याचे आदेश कोणाचे?

भाजपा व देवेंद्र फडणवीसच ओबीसींच्या न्याय हक्काचे मारेकरी.

मुंबई, दि. २१ डिसेंबर-राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी विभागाने पुण्यातील ‘ज्ञानदीप’ संस्थेला तिप्पट शुल्कवाढ देण्याचे प्रस्तावित करून कोणाचा फायदा करून दिला जाणार आहे. वर्षाला ६ टक्के दरवाढ मंजूर असताना २०० टक्के शुल्कवाढ कोणाच्या सांगण्यावरून केली तसेच महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना ‘ज्ञानदीप’ वरच विशेष मेहेरबानी का? ‘महाज्योती’ला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून शिंदे-फडणवीस सरकारने ओबीसी-व्हिजेएनटी मुलांचे हक्क हिरावून घेऊ नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘महाज्योती’कडून एमपीएससी, यूपीएससीसह, जेईई आणि नीट या परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. ‘महाज्योती’ने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर ‘ज्ञानदीप’ या एकमेव प्रशिक्षण संस्थेचा पर्याय दिला आहे. आता शुल्क वाढीतील गौडबंगाल पुढे आले असून त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये. भारतीय जनता पक्ष (ओबीसी) इतर मागास समाजाच्या कल्याणकारी योजनांमध्ये अडथळा आणत असते. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलतीही मिळू दिल्या जात नाहीत. महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजातील मुलांना चांगल्या संधी मिळायला पाहिजेत पण भाजपा ओबीसी समजातील विद्यार्थ्यांना संधींपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न करत आहे.

ओबीसी समाजाने भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान करून केंद्रात व राज्यात सत्ता दिली पण भाजपा व देवेंद्र फडणवीस हेच ओबीसींच्या न्याय हक्काचे खरे मारेकरी आहेत. ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी समांतर आरक्षण चालवले जात आहे. युपीएससीची परीक्षा न घेताच एका विशिष्ट समाजातील मुलांना थेट सहसचिव पदावर नियुक्ती देऊन ओबीसी व इतर मागास जातींच्या मुलांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणही भाजपा व फडणवीस यांच्या आडमुठेपणामुळेच गेले. राज्य ओबीसी आयोगाची स्थापन केली नाही. भाजपाला आरक्षणच नको असल्याने ते विविध मार्गाने ते संपवण्याचे काम करत आहे. जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय या ओबीसी समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळणार नाहीत, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.