धनगर आरक्षणांवरून सरकारवर धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

0
6
मुंबई,दि.10-विनोद तावडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  आज गुरुवारला फडणवीस सरकारवर धनगर आरक्षणांच्या मुद्यांवरून हल्लाबोल केला. आमचे (भाजप) सरकार सत्तेत आल्यास महिन्याभरात आरक्षण देऊ असा शब्द या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. बारामतीत जाऊन धनगर समाजाचे आंदोलन फडणवीस यांनी सोडवले होते, मग अजून या समाजाला आरक्षण का मिळत नाही असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. यावर आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडे यांनी राज्याचे प्रमुख फडणवीस यांनीच उत्तर द्यावे व या सरकारला धनगर समाजाला आरक्षण तरी द्यायचे आहे का? हे एकदा स्पष्ट करावे असा हल्लाबोल केला.
 
आदिवासी मंत्री सावरा म्हणाले, धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देता येणार नाही. मात्र, टाटा सोशल सायन्सेस ही खासगी संस्था धनगर समाजाच्या अधिवासाबाबत संशोधन करीत आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच याबाबत निर्णय होईल. 2017 पर्यंत हा अहवाल येणे अपेक्षित आहे असेही सावरा यांनी सांगितले. यानंतर विरोधकांनी विधान परिषदेत गदारोळ सुरु केला व कामकाज तहकूब करण्यात आले.