औरंगाबाद नागपूर हायस्पीड ट्रेनसाठी स्पेनच्या तज्ज्ञांची भेट

0
4
औरंगाबाद, दि. 10 – भारतीय रेल्वे आणि स्पेन रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोर हा प्रकल्प हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दृष्टीने स्पेनच्या चार सदस्यीय पथकाने गुरुवारी मॉडेल रेल्वेस्टेशनची पाहणी केली. या कॉरिडोरमध्ये औरंगाबादचा समावेश होण्यास सर्व बाबी अनुकूल असल्याचे संकेत या पथकाने दिले आहेत.
त्यामुळे आगामी काही वर्षात औरंगाबादमार्गे ताशी २०० कि.मी. वेगाने हायस्पीड ट्रेन धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे औरंगाबादहून नागपूर आणि मुंबई अवघ्या १ तास ४० मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.
भारतीय रेल्वे आणि स्पेन रेल्वे यांच्या वतीने मुंबई-कोलकाता हायस्पीड कॉरिडोर रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोर केला जाणार आहे. या दोन्ही शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे चालविता येऊ शकते का ? याची चाचपणी आणि सर्वेक्षण स्पेनच्या पथकाकडून सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत या पथकाने मुंबई, ठाणे, नाशिक, आकोला, जळगाव, भुसावळ रेल्वेस्टेशनची पाहणी केली.