कर्जमाफीवरून विरोधक- सत्ताधा-यांत घमासान

0
9

वृत्तसंस्था

मुंबई- शेतक-यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे या विरोधकांच्या मागणीनंतर सत्ताधा-यांनी जोरदार हल्लाबोल केल्याने विधानसभेत विरोधक व सरकार यांच्यात चांगलेच घमासान झाले. आघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या पापामुळेच शेतक-यांवर वाईट वेळ आली आहे अला कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळेच सहकारी बँका बुडाल्या व त्याचा शेतक-यांना फटका बसला. आघाडी सरकारने 70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर शेतक-यांवर ही वेळ आली नसती. विरोधक कर्जमाफीवरून फक्त राजकारण करीत आहेत असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्यांवरून विरोधकांनी सभात्याग केला.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला सरकारने दिलेले उत्तर दिशाभूल करणारे असल्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबद्दल सरकारचा निषेध केला. जानेवारी ते डिसेंबर 2015 या कालावधीत राज्यातील 3228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली सरकारने दिली. मात्र त्यापैकी 1841 आत्महत्याच शेतीच्या कारणासाठी झाल्याचा दावा सरकारने केला आहे. मग उरलेल्या 1387 आत्महत्येची कारणे काय आहेत? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला होता.
यावर खडसे यांनी ‘विसेरा’चा अहवाल आल्यावरच आत्महत्येचे कारण आणि मदत देण्यासंदर्भात कार्यवाही केली जात असल्याची माहिती दिली. यावर मुंडे यांनी तीव्र आक्षेप घेत, ‘विसेरा’ फक्त आत्महत्या कशी झाली हे सांगू शकते. आत्महत्येचे कारण ‘विसेरा’ कसे ठरवणार, असा सवाल मुंडे यांनी केला. सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची नसल्यानेच सरकार चुकीचे उत्तर देत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एक लाखाऐवजी दोन लाख मदत देण्यासाठी सभागृहात आम्ही मागणी केली असतानाही सरकार अशी कोणतीच मागणी अद्याप झाली नसल्याचे धादांत खोटे सांगत आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. यानंतर खडसेंनी यापुढे आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना सरसकट 1 लाखांची मदत तत्काळ दिली जाईल अशी घोषणा केली.