दहा शहरांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश – रामदास कदम

0
10

मुंबई : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि सोलापूर या दहा शहरांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले. 

राज्यातील प्रदूषण आणि दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत प्रदूषण कमी करण्याबाबतचा प्रश्न सदस्य श्रीमती दिप्ती चवधरी यांनी विचारला होता. 

श्री.कदम म्हणाले, या कृती आराखड्यामध्ये मुंबईतील वाहने, कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण, सांडपाणी, घनकचरा प्रदूषण याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यास सांगितले आहे.

दिल्लीतील सम-विषम प्रयोगाबाबत त्यांनी स्पष्ट केले, हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. मुंबईत हा प्रयोग करण्याचे प्रस्तावित नाही. देवनार आगप्रश्नी ते म्हणाले, आग कुणी लावली याबाबतचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायोमेडिकल वेस्टसाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रदूषण रोखणाऱ्या मशीन लावल्या असून प्रदूषण करणारे कारखाने, हॉटेल्स, बांधकाम व्यावसायिक यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्या आहेत. 

या चर्चेत सदस्य हेमंत टकले, भाई जगताप, जयंत पाटील, सुनील तटकरे, श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी सहभाग घेतला.