अभिव्यक्तीच्या प्रत्येक माध्यमातून सकारात्मक परिवर्तनात योगदान द्यावे – मुख्यमंत्री

0
21

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे दिमाखदार सोहळ्यात वितरण

मुंबई : समाजातील विषमता संपविण्यासाठी चांगल्या गोष्टींची नोंद घेत सामाजिक प्रवाहाला विधायक वळण देण्याची ताकद पत्रकारितेत आहे. पत्रकारांनी अभिव्यक्तीच्या प्रत्येक माध्यमातून सकारात्मक गोष्टींना बळ देऊन परिवर्तनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2015’चे वितरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या माहिती व जनसंपर्क सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर आदी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक उत्तम कांबळे यांना यावेळी लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी राज्यस्तरावरील व विभागीय स्तरावरील विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सामाजिक- आर्थिक सुधारणांमध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केलेल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींच्या नावाने शासनाकडून पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांमुळे जनतेच्या अपेक्षा वाढतात, तसेच पुरस्कारानंतर येणारी जबाबदारी पुरस्कारार्थींवर वाढली आहे. कामांचे सिंहावलोकन करणे, काय कार्य राहिले याचा विचार करणे व पुन्हा नव्या ध्येयाकडे वाटचाल करणे, ही संधी पुरस्कारानिमित्ताने मिळत असते. व्यक्तीकडून अविरतपणे केल्या जाणाऱ्‍या कामाची दखल समाजाने घेणे आवश्यक असते. राज्य शासन अशा पुरस्काराच्या माध्यमातून समाजाच्यावतीने चांगल्या कामाची दखल घेण्याचे काम करत आहे. 

आयुष्यात संघर्ष करत करत समाजाला मार्गदर्शन करण्यापर्यंत स्वतःचे व्यक्तिमत्व घडवत जाणे ही उत्तम कांबळे यांची वाटचाल कुठल्याही नायकापेक्षा कमी नाही. समाजाला अशा नायकांची आवश्यकता आहे. त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. त्यामुळे अशा नायकाला जीवन गौरव पुरस्कार देऊ शकलो ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 


पुरस्काराच्या रकमेत वाढ
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारातील 41 हजार रुपयांच्या पुरस्काराची रक्कम वाढवून ती 51 हजार रुपये करण्यात यावी, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्रकारांना सन्मानाने जगता यावे, त्यांची व्यक्तिगत व सामाजिक सुरक्षा या दोन्ही गोष्टींची जपणूक व्हावी, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

गेल्या 35 वर्षांतील माझ्या लेखनाचा नायक झालेले तळागाळातील लोक, उजेडात येण्यासाठी धडपडणारे व विकासात स्पेस मिळेल की नाही, याचा शोध घेणारे बिनचेहऱ्‍याचे लोक आणि मला लेखनाचे संपूर्ण स्वातंत्र्य देणारा सकाळ माध्यम समूह हे आज मला मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आहेत, अशी भावना श्री. कांबळे यांनी व्यक्त केली. 

माध्यमांच्या जगात अल्पसंख्येत असलेला चांगुलपणा बहुसंख्येत आणणे गरजेचे आहे. सामाजिक बातम्या छापण्यास कोणाचाही विरोध असत नाही. चांगल्या गोष्टींना प्रत्येक माध्यमात एक स्पेस असते. ती स्पेस शोधून सुंदर समाजाचे चित्र रेखाटणे हे चांगल्या पत्रकाराचे लक्षण आहे. त्यासाठी फक्त बातम्या न छापता त्या समस्याच्या शेवटापर्यंत पत्रकारांनी जायला हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, माध्यमांमध्ये अनेक बदल होत आहेत. मुद्रीत माध्यमांबरोबरच इलेक्ट्रॉनिक माध्यमेही विस्तारली आहेत. त्याचबरोबर जगभरात सोशल मीडियाचा मोठा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे पुरस्कारामध्ये पुढील काळात सोशल मीडियाला जास्त प्रतिनिधीत्व देण्यात येणार आहे. माध्यमांकडे परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. त्याचा वापर विधायकतेसाठी व्हावा. 

यावेळी पुरस्कार परीक्षण समितीमधील सदस्य उदय तानपाठक, कृष्णा शेवडीकर, ब्रिजमोहन पांडे, केतकी घुगे यांचा यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी परीक्षकांतर्फे श्री. तानपाठक व पुरस्कारार्थींतर्फे श्रीमती सुषमा नेहरकर- शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संचालक (माहिती) श्री.मानकर यांनी केले. तर, संचालक (प्रशासन) श्री. भुजबळ यांनी महासंचालनालयाच्या कामाचा आढावा घेऊन आभार मानले. संजय भुस्कुटे यांनी सूत्रसंचालन केले.