शहरीकरणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्स मैत्री शहरे बैठकीत चर्चा करणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
13
मुंबई : जगभरात शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून अनेक आव्हानांचा कसा सामना करता येईल या दृष्टीने चर्चा करण्यासाठी 14 ते 16 एप्रिल दरम्यान मुंबईत ब्रिक्स मैत्री शहरे बैठक आयोजित केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ट्रायडंट येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, जगात नागरिकरणाची प्रक्रिया झपाट्याने होत आहे. पन्नास टक्के जनता ही शहरात राहत असून नागरिकीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नागरिकीकरण ही समस्या न मानता त्याचे निराकरण आणि नियोजन करणे महत्त्वाचे असून या विषयी या बैठकीत विचार विनियम केला जाणार आहे. या बैठकीसाठी ब्राझील देशाचे 5, रशियाचे 20, द.आफ्रिकेचे 6, चिनचे 30 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

जगातील ज्या देशांनी उत्तम प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करुन शहरांचा विकास साधला, अशा उपाययोजनांची चर्चा या बैठकीत केली जाणार असून शहरी प्रशासन मजबूत करणे, शहरांची सुरक्षा, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वत शहरांची उभारणी, परवडणारी घरे निर्माण करणे तसेच शहरांचे शाश्वत नियोजन या मुद्यांबाबत बैठकीत व्यापक चर्चा करण्यात येणार आहे.

मुंबई फर्स्ट या विचार गटातर्फे या बैठकीचे आयोजन केले जाणार असून भारत सरकार, महाराष्ट्र सरकारचा सक्रिय पाठिंबा आहे. या मंचाचे स्वरुप जागतिक असून त्याला ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या भागीदार देशांचा पाठिंबा मिळालेला आहे.

या देान दिवसीय बैठकीसाठी जगातील 75 प्रतिनिधी उपस्थित राहाणार असून त्यात राज्यपाल, शहर नेते, शहर नियोजक, मंत्री आणि या देशांतील विविध तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे. केंद्रीय शहर विकास मंत्री श्री. वैंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत 14 एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता हॉटेल ट्रायडंट येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. राज्यपाल चे.विद्यासागर राव या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

याप्रसंगी शहरी आव्हानांवर आधारित ‘मेकिंग ऑफ व्हायब्रंट ब्रिक्स सिटीज’ या खास पुस्तकाचे प्रकाशन होणार असून या विषयात तज्ज्ञ असलेल्या जगभरातील 35 जणांनी या पुस्तकासाठी लेखन केले आहे. तसेच राज्यपाल यांच्या हस्ते खास तिकिटाचेही अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप शनिवार,16 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे.

पत्रकार परिषदेला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय केंद्रीय, सहसचिव आलोक डिमरी, मुंबई फर्स्टचे अध्यक्ष नरिदंर नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर जोशी आदी उपस्थित होते.

ब्रिक्स देशाचे अध्यक्षपद भारताकडे!

2014 मध्ये ब्राझिल येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी व्यक्त केलेला दूरदृष्टीकोन या बैठकीद्वारे चर्चिला जाणार आहे. गेल्यावर्षी रशिया येथे झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी ब्रिक्स देशांमधील घट्ट परस्पर संबंधांचे महत्त्व प्रामुख्याने विशद केले आणि ‘ब्रिक्स राष्ट्रांदरम्यान राज्य/स्थानिक सरकार,आणि शहरांमधील परस्पर सहकार्य’ यांचे महत्त्व अधोरेखित केले होते. फेब्रुवारी 2016 पासून एका वर्षासाठी ब्रिक्स देशांचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मैत्री शहरे बैठक 2016 ही भारताकडे असलेल्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीअंतर्गत आयोजित करण्यात आलेला पहिला मुख्य कार्यक्रम आहे.