सुरजागड खाणप्रकल्पासंबंधी जनसुनावणी घ्या: माजी आ.दीपक आत्राम

0
10

गडचिरोली-: सुरजागड पहाडावरुन लोह उत्खनन करुन त्याची वाहतूक अन्यत्र करण्यात येत असल्याप्रकरणी परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळण्याची आशा धुळीस मिळाली आहे. त्यामुळे सुरजागड खाण प्रकल्पासंदर्भात एटापल्लीत जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी माजी आमदार दीपक आत्राम यांनी केली आहे.

यासंदर्भात दीपक आत्राम व जिल्हा परिषदेचे कृ्षी सभापती अजय कंकडालवार यांनी मुख्यमत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील दोन महिन्यांपासून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील १९७, १९८, १९९, २२८ खंड क्रमांकामधील ३४८.०९ हेक्टर जागेमधून लॉयड मेटल्स कंपनीने लोहखनिज उत्खननाचे काम सुरु केले असून, रस्ते तयार करुन लोहखनिजाची वाहतूकही करण्यात येत आहे. लोहखनिजाची वाहतूक अन्यत्र केली जात असल्याने परिसरात कारखाना होणार नाही, हे स्पष्ट आहे. शिवाय तालुक्यातील बेरोजगारांनाही रोजगार मिळण्याची आशा धुळीस मिळाली आहे. सुरजागडच्या खनिज संपत्तीकडे एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार मोठया आशेने बघत आहेत. अशा स्थितीत लॉयड मेटल्स कंपनीने काम सुरु केले आहे. परंतु खनिज उत्खनन करुन ते अन्यत्र नेण्यात येत असल्याने एटापल्ली तालुक्यातील बेरोजगारांना कंपनी रोजगार देणार काय, कंपनीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एटापल्लीत जनसुनावणी घेणार काय, याबाबत जनतेला कुठलीही माहिती न देता लॉयड मेटल्स कंपनीने गुपचूप खनिज वाहतूक सुरु केली आहे. हा पाच तालुक्यांतील जनतेवर अन्याय असल्याने लोहखनिज वाहतुकीचे काम तत्काळ बंद करुन एटापल्ली येथे जनसुनावणी घ्यावी व नंतरच काम सुरु करावे, अशी मागणी माजी आमदार दीपक आत्राम, कृषी सभापती अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.