मनरेगांतर्गत मोहाडी पंचायत समितीच्या कामात गैरव्यवहार नाही – पंकजा मुंडे

0
10

भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीमध्ये सन 2015-16 यावर्षीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही. पशुसंवर्धनाच्या कामांची चौकशी करण्यात येऊन त्याचा अहवाल पंधरा दिवसात प्राप्त करुन संबधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य चरण वाघमारे यांनी याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2015-16 यावर्षाकरिता मोहाडी पंचायत समितीला देण्यात आलेल्या 21 लाख मनुष्य दिवसाच्या उद्दिष्टांपैकी 12 लाख उद्दिष्ट साध्य झाले आहे. तसेच योजनेअंतर्गत 22 कामे पूर्ण झाली आहेत. मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात 69 गावातील 682 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 2015-16 या आर्थिक वर्षात मंजूर लेबर बजेट व संभाव्य खर्चाच्या प्रमाणात उल्लंघन केल्याचे दिसून येत नाही.

मनरेगाअंतर्गत प्रशासकीय मंजूरी दिलेली कामे ग्रामसभेच्या नियोजनात असून त्यास पंचायत समिती सभेच्या मासिक सभा ठरावान्वये पूरक नियोजनास मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये 29 ग्रामपंचायतीपैकी 13 ग्रामपंचायतींच्या कामांचा उल्लेख असून उर्वरित 16 ग्रामपंचायतींचा उल्लेख नाही अशी किरकोळ चूक आहे. मोहाडी पंचायत समितीला मनरेगांतर्गत 229 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत 125 विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणताही अर्थिक गैरव्यव्हार झालेला नाही, तसेच गट विकास अधिकारी यांचे काम समाधानकारक असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.