अग्रवाल मारहाण प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ

0
13

मुंबई : गोंदियाचे काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांना भाजपाच्या नगरसेवकाकडून झालेली मारहाण, सटाण्याचे माजी नगराध्यक्ष विजय वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलीस अधिकार्‍याने केलेली मारहाण आणि सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी प्रचंड आक्रमक झालेल्या विरोधी पक्ष सदस्यांनी आज सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. या गदारोळात कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.अखेरीस, मुख्यमंत्र्यांना दुपारी निवेदनात सांगितले की, आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करणारे शिवकुमार शर्मा आणि राहुल श्रीवास यांचा शोध घेण्यासाठी सहा शोधपथके तयार करून बालाघाट, जबलपूर आणि नागपूर येथे रवाना केली आहेत. मोबाईल टॉवर लोकेशनवरून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
अशा घटना म्हणजे राज्याच्या ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचे प्रतीक असून सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आता मारहाणीवर उतरले आहेत. पोलीसही त्यांची मदत करीत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
या तिन्ही घटनांचा उल्लेख करीत विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेचे कामकाज सुरू होताच सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करणे सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. दीपिका चव्हाण, सुमन पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी डायसवर चढून घोषणा दिल्या.
संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री तासाभरात कृतीसह निवेदन करतील, असे सांगितले. पण आमदारांवरील हल्ला ही गंभीर बाब असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे निवेदन होईपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतला. या वेळी गदारोळात कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.