येत्या तीन वर्षात सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार – मुख्यमंत्री

0
10

नागपूर ठरला ‘डिजिटल ग्राम’ करणारा पहिला जिल्हा

मुंबई : ‘डिजिटल इंडिया’ च्या धर्तीवर राज्यात ‘डिजिटल ग्राम’ ही योजना सुरू झाली असून या योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील खंडाळा, तरोडी, खसाळा, दाभा आणि विहिरगाव या पाच ग्रामपंचायती ‘डिजिटल ग्राम’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सर्व ७७६ ग्रामपंचायती येत्या ऑगस्टपर्यंत नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहेत. नागपूर हा जिल्हा ‘डिजिटल ग्राम’ करणारा देशातला पहिला जिल्हा ठरणार आहे. पुढील तीन वर्षात राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना ‘डिजिटल ग्राम’ करण्याचा शासनाचा संकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेचा प्रत्यय म्हणून नागपूर हा पहिला डिजिटल जिल्हा ठरला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील पाच डिजिटल गावांचा आज शुभारंभ करण्यात आला. यात मौदा तालुक्यातील खंडाळा, कामठी तालुक्यातील खसाळा व तरोडी बुद्रूक, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील विहीर गाव या पाच ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

या कार्यक्रमास मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, भारत ब्रॉडबँड निगम लि. चे ऐ.के.सक्सेना, सिस्कोचे व्यवस्थापकीय संचालक पुरूषोत्तम कौशिक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासमोर डिजिटल इंडिया ही संकल्पना मांडली. या संकल्पनेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून शहर आणि ग्रामीण भागातील दरी नष्ट होणार आहे. डिजिटल ग्राम या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या ज्ञानामध्ये परिवर्तन होताना दिसत आहे. या क्रांतीतून स्मार्ट शहरांबरोबर जो पर्यंत स्मार्ट गावे निर्माण करत नाहीत तो पर्यंत देशात परिवर्तन आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था उभी करता येणार नाही. यावर उपाय करण्यासाठी ‘डिजिटल हायवे’ चे तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचल्यास गावांचा विकास करता येणे शक्य आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जगभरातील आरोग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन ‘डिजिटल हायवे’ च्या माध्यमातून केले जाणार असून यातून एक प्रकारची आरोग्य क्रांती उदयास येणार आहे.

‘डिजिटल हायवे’ सुविधा ग्रामीण भागात पोहोचल्यास अनेक व्यवस्था निर्माण करता येतील. ज्याच्या माध्यमातून शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. तसेच ‘डिजिटल मार्केट ‘या संकल्पनेच्या माध्यमातून जगात कुठल्याही बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री, खरेदी व मालाचे भाव माहित करुन घेण्याबरोबरच शेतकऱ्यांना मोबदलाही घेता येणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर डिजिटल कनेक्टिव्हिटीतून तरूण बेरोजगारांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख करता येईल. तसेच नव-नवीन उपक्रमांमध्ये सहभागी करून रोजगार उपलब्ध करून देता येईल. मुंबईतील अनेक तज्ज्ञ राज्यातील ग्रामपंचायतींना एकाचवेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन करू शकणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सर्व गावांमध्ये ई-ग्रंथालय सुरू करण्याबाबत शासन विचाराधीन असून या ई-ग्रंथालयात जगभरातील सर्व पुस्तक साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरोडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच खसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा रुग्णांना जेजे. रुग्णालय मुंबई येथील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना भारत नेटच्या माध्यमातून २० एमबीपीएस क्षमतेची इंटरनेट जोडणी उपलब्ध करण्यासाठी पीडब्ल्यूसी या प्रकल्प सल्लागाराने सखोल नियोजन व सर्वेक्षण तयार केलेला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द करण्यात आला. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

प्रत्येक ग्रामपंचायतीत डिजिटल बोर्ड

राज्यात लवकरच स्वयंचलित हवामान यंत्रे बसविण्याचा शासनाचा मानस असून राज्यातील ग्रामपंचायतीची डिजिटल कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर या यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीपूरक वातावरणाची माहिती, पाऊस कधी पडणार, पावसामुळे होणारे नुकसान व फायद्याची माहिती, लागवड, पीक संरक्षणाबाबतची माहिती भविष्यात डिजिटल बोर्डवर देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्याने ट्विटरवरुन मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

‘डिजिटल ग्राम’ चा कार्यक्रम सुरु असतानाच नागपूर जिल्ह्यातील खसाळा या डिजिटल गावच्या अस्मित लोखंडे या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विटरवरुन आभार मानले. आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याच्या सक्षमीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.