चंद्रपूर जिल्हा राज्यात उत्तम करण्याचा संकल्प करु या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
9

चंद्रपूर: ‘एक मेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे आपल्या विकासाचा केंद्रबिंदू दीन, दलित, शोषित, पीडित, आदिवासी, शेतमजूर व शेतकरी असला पाहिजे, असे सांगून चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर राज्यात अग्रेसर करण्याचा संकल्प महाराष्ट्र दिनी करु, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.


सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील 13,667 लाभार्थ्यांची रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व जमातीच्या 4470 लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेत घरकुल मंजूर करण्यात आले आहे. 

यावेळी पालकमंत्री यांनी जिल्ह्यात झालेल्या व होऊ घातलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. विविध क्षेत्रात पुरस्कार तसेच प्राविण्य मिळविणाऱ्या अधिकारी, पोलीस व उद्योजक यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधानाची प्रास्ताविका व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांना देण्यात आले.