१० ठिकाणी होणार राज्यात खनिज सर्वेक्षण

0
11

नागपूर, दि. 11- भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे २०१६-१७ मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण १० योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक, चंद्रपूर जिल्हा लोह खनिजासाठी, अहमदनगर, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील सामान्य सर्वेक्षण योजनांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची ५२ वी बैठक नागपूर येथे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व केंद्र शासनाच्या भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभाग व इतर यंत्रणेद्वारे कार्यसत्र २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र राज्यात केलेल्या भूवैज्ञानीय सर्वेक्षण व खनिज समन्वेषण कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच २०१६-१७ मध्ये संबंधित विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भूवैज्ञानीय कार्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.