नागपूरमध्ये राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था- मुख्यमंत्री

0
31

 राज्यातील विविध ठिकाणी 100 जन औषधी केंद्रे उभारणार

– नागपुरातील मेडिकल डिव्हाईस पार्कला मंजुरी

– पुणे व जळगावमध्ये प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्थेचे केंद्र

– जळगावमध्ये उभारणार प्लास्टिक पार्क

– औरंगाबादमध्ये बल्क ड्रग पार्क उभारणार

– आरसीएफच्या थलमधील तिसऱ्या प्रकल्पात 13 लाख टन खताची निर्मिती

   – केंद्रीय रसायन व खत मंत्री अनंत कुमार यांच्याबरोबर बैठकीत निर्णय

मुंबई, दि. 16 : राज्यात शंभर जनऔषधी केंद्र उभारण्यासाठी केंद्र शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून नागपूर येथे मेडिकल डिव्हाईस पार्क आणि औरंगाबाद येथे बल्क ड्रग पार्क उभारले जाणार आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन अँड रिसर्च नागपूर येथे केंद्र उभारण्याबरोबरच केंद्रीय प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था(सीआयपीईटी) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रसायन व खते मंत्री अनंत कुमार यांनी आज येथे दिली. या सर्व कामांना येत्या सहा महिन्यात सुरुवात होईल, असेही श्री. अनंत कुमार यांनी यावेळी सांगितले.
            केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंतकुमार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याबरोबर राज्यातील विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. अनंतकुमार बोलत होते. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांच्यासह केंद्रीय रसायन व खत मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात या वर्षात तीन हजार जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे घोषित केले आहे. त्यातील शंभर जनऔषधी केंद्र महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भात लवकरच राज्य व केंद्र
शासन यांच्यात करार करण्यात येणार असल्याचे श्री. अनंत कुमार यांनी सांगितले. या जनऔषधी केंद्रांमध्ये सुमारे विविध 600 जेनेरिक औषधे व  150 इतर साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याची किंमत ही
बाजारभावापेक्षा कमी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, हानगरपालिकांची रुग्णालये तसेच सार्वजनिक ठिकाणी ही जन औषधी केंद्रे उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध होतील. या केंद्रासाठी राज्य शासन जागा उपलब्ध करून देईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

           केंद्र शासनाने देशभरात तीन ठिकाणी राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक महाराष्ट्रातील नागपूर येथे उभारण्यासाठी या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये शंभर एकर जागेत ही संस्था उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र शासन
करणार असल्याचे श्री. अनंतकुमार व श्री. फडणवीस यांनी सांगितले. या माध्यमातून औषध निर्माण क्षेत्राला चालना मिळून लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 वैद्यकीय क्षेत्राला लागणारी साधने देशातच निर्माण व्हावीत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून नागपूर येथे त्यासाठी मेडिकल डिव्हाईस पार्क उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी हृदयविकारात लागणाऱ्या स्टेंटपासून सर्व साहित्याची निर्मिती होणार आहे. त्यामुळे स्वस्त व स्वदेशी साहित्य नागरिकांना मिळणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

     प्लास्टिक अभियांत्रिकी क्षेत्रात सध्या साडेआठ लाख कुशल अभियंत्यांची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात चाळीस ठिकाणी केंद्रीय प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था (सीआयपीईटी) उभारत आहे. महाराष्ट्रातही औरंगाबाद व चंद्रपूर येथे हे केंद्र सुरू असून जळगाव व पुणे येथे नवीन संस्था उभारण्यात येणार आहे. त्यातील औरंगाबाद येथे सध्या चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही क्षमता वाढवून सहा हजार करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनास मदत करणार आहे. तर चंद्रपूर येथील संस्थेस राज्य शासन पंधरा एकर जागा देणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
                 जळगाव येथे प्लास्टिक पार्क उभारण्यासही यावेळी केंद्रीय मंत्री श्री. अनंत कुमार यांनी मंजुरी दिली. शंभर एकरामध्ये उभारण्यात येणाऱ्या या पार्कमध्ये सुमारे एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे. सुमारे
एक हजार कोटी रुपयांची ही गुंतवणूक असणार आहे. या प्लॅस्टिक पार्कमध्ये प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याचे उद्योग उभारण्यात येणार आहेत, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.  औषधे बनविण्यासाठी लागणारे 60 टक्के साहित्य चीनमधून आयात करावी लागतात. या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने गुजरात, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील हे पार्क औरंगाबाद येथे उभारण्यात येणार असल्याचे श्री. अनंतकुमार यांनी सांगितले.