मातंग समाजाच्या विकासासाठी कृती आरखडा तयार करणार – मुख्यमंत्री

0
8

पुणे : मातंग समाजाच्या विकासासाठी नियुक्त केलेल्या अभ्यासगटाने 2011 मध्ये शिफारस केलेल्या 64 शिफारशींपैकी अद्याप दहा टक्के शिफारशींचीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या सर्व शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांची आढावा बैठक येत्या 15 दिवसात बोलावून शिफारशी तातडीने लागू करण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.

पुण्याजवळील कान्हेफाटा परिसरात मातंग ग्रुप डेव्हलपमेंट यांच्यातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजित समाजातील अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार संजय भेगडे, संयोजक अमित भेगडे आदी उपस्थित होते.
मातंग समाजाने हाल-अपेष्टा, अपमान सहन करुन समाजसेवेचे व्रत धारण करत आपला व्यवसाय चालविला आहे. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या 68 वर्षात या समाजाची फारशी परिस्थिती बदलली नाही, हा समाज आजही शिक्षणापासून वंचित आहे. नोकरी, व्यवसायात हा समाज फारसा पहावयास मिळत नाही. हा समाज आजही गरिबीत कष्ट करुन जगताना दिसून येत आहे, या समाजाची प्रगती करण्यासाठी अभ्यास गट निर्माण झाले. त्यातीलच एका अभ्यास गटाने 2011 मध्ये या समाजाच्या प्रगतीसाठी 64 शिफारशी केल्या. त्या सर्व 64 शिफारशी स्वीकारण्यात आल्या. परंतु या स्वीकारलेल्या शिफारशींपैकी 10 टक्के शिफारशींवरही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात 15 दिवसात आढावा बैठक घेवून या शिफारशी लागू करण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.