बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दलाने सक्षम व्हावे -मुख्यमंत्री

0
17

 नाशिक, दि. 8 : गुन्ह्यांचे स्वरुप सातत्याने बदलत असून
प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांनी बदलत्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना
करण्यासाठी सक्षम व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केले.

            महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी अंतर्गत प्रशिक्षणार्थी पोलीस
उपनिरीक्षक सत्र क्र. 113 च्या दीक्षांत संचलन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला  पालकमंत्री गिरीष महाजन, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम
शिंदे, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, पोलीस महासंचालक प्रविण
दीक्षित, प्रबेाधिनीचे संचालक नवल बजाज, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी
फरांदे, सीमा हिरे आदी उपस्थित होते.

            श्री. फडणवीस म्हणाले, गडचिरोलीसारख्या ठिकाणी पोलीस दल
धैर्याने उत्तम कामगिरी करीत आहे. बाह्य शक्तींचा उपद्रव दिवसेंदिवस
वाढतो आहे. अशा शक्तींना नेस्तनाबूत करीत सामान्य माणसाच्या जीवनातील
शांतता कायम राखण्याची जबाबदारी पोलीस दलावर आहे. पोलीस दलाला दैनंदिन
गुन्हे, वाहतुकींचे नियंत्रण आदी बाबींकडे लक्ष द्यावे लागते.
तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे वाढत आहेत.
या गुन्ह्यांचा समर्थपणे सामना करण्यासाठी प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या
बाबींचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. शहीद तुकाराम ओंबळे यांचा
गौरवपुर्ण उल्लेख करीत शौर्य आणि त्यागाची ही परंपरा नव्याने पोलीस दलात
दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुढे न्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

            गतवर्षी केलेल्या घोषणेनुसार प्रबोधिनीला स्वायत्तता देण्यात
आल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री  म्हणाले, स्वायत्ततेमुळे प्रबोधिनीच्या
विकासाला गती आली आहे. प्रबोधिनीच्या विकासासाठी करण्यात आलेल्या पुढील
नियोजनालाही शासन पाठबळ देईल. देशातील सर्वोत्तम प्रबोधिनी म्हणून
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा विकास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रबोधिनीच्या विकासासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेतच मात्र
त्यापेक्षा देशभक्तीची भावना, समाजाप्रति असणारे प्रेम आणि पोलीस दलातील
शिस्त महत्वाची आहे. शिस्तबद्द दलाचे सदस्य म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी
आहे त्या परिस्थितीत कर्तव्यभावनेने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न
करावा, असे आवाहन त्यांनी केले.

            प्रबोधिनीच्या इतिहासात प्रथमच महिला प्रशिक्षणार्थीला
प्रशिक्षणातील सर्वोच्च ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ (मानाची तलवार) हा सन्मान
मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी तो मिळविणाऱ्या  मीना तुपे
यांचे कौतुक केले. देशातील नारीशक्तीच्या उदयाचे हे द्योतक असून समाज
पुढे जात असताना महिलाशक्तीने पुढे येणे गरजेचे आहे. प्रशिक्षणात 250
महिला अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने त्यांच्या रुपाने पुढे जाणाऱ्या
देशाचे चित्र पाहावयास मिळाले, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

            पोलीस प्रबोधिनीचा अहवाल सादर करताना श्री. बजाज यांनी  सत्र
क्र. 113 च्या तुकडीत 503 पुरुष आणि 246 म‍हिला अधिकाऱ्यांचा समावेश
असल्याचे सांगितले. स्वायत्ततेमुळे प्रबोधिनी व्यावसायिक स्तरावर कार्यरत
होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रशिक्षणार्थींना मुलभूत
प्रशिक्षणाबरोबरच सायबर गुन्हे, आतंकवाद आदींबाबत अन्वेषण पद्धतीचे
प्रशिक्षण देण्यात आल्याचे ते म्हणाले.

            मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशस्वी प्रशिक्षणार्थींना
गौरविण्यात आले. उत्कृष्ण प्रशिक्षणार्थीचा ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ मीना
भिमसिंग तुपे यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट अष्टपैलू
प्रशिक्षणार्थीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक आणि सर्वोत्कृष्ट
महिला प्रशिक्षणार्थीसाठी असलेला अहिल्याबाई होळकर चषकही  श्रीमती तुपे
यांनीच पटकाविले. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (द्वितीय) प्रदिप लाड,
सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वोत्तम- धनाजी देवकर, ड्रीलमध्ये सर्वोत्कृष्ट
प्रशिक्षणार्थी – दिपमाला जाधव, एन.एम.कामथे सुवर्ण पदक विजेता- प्रशांत
मुंडे, अध्ययनासाठी उत्तम बॅटन आणि सावित्रीबाई चषक पुनम सुर्यवंशी आणि
डॉ.आंबेडकर चषक पुनम सुर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.

            कार्यक्रमाची सुरूवात शानदार संचलनाने झाली. 8 प्लाटुन्सचे
283 अधिकारी संचलनात सहभागी झाले होते. परेड कमांडर प्रियांका गोरे आणि
सेकंड इन कमांड रविन्द्रकुमार वैजनाथ यांनी संचलनाचे नेतृत्व केले.

            कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब
सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ.राहुल आहेर, महापौर अशोक मुर्तडक,
विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन  बी. महानगरपालिका
आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन, पोली स महानिरीक्षक
विनयकुमार चौबे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक
संजय मोहिते आदी उपस्थित होते.