मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-अकॅडमीचे उद्घाटन

0
8

नाशिक, दि. ८ : महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या ई- लर्निंग उपक्रमाच्या
माध्यमातून जगभरातील ज्ञानभांडार अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी पोलिस
अधिकाऱ्यांना खुले झाले आहे, त्याचा उपयोग समाजाभिमूख जबाबदारी पार
पाडण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्र पोलिस
प्रबोधिनीच्या ई-अकॅडमीचे उद्घाटन, आणि ओपन एअर थिएटर व अकॅडमी
कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री
गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा.राम शिंदे, आमदार देवयानी
फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहूल आहेर, महापौर अशोक
मुर्तडक, पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित, प्रबोधिनीचे संचालक नवल बजाज
आदी उपस्थित होते.

ई- अकॅडमी प्रणालीचा प्रभावी उपयोग होण्यासाठी ब्रॉडबॅन्ड लिज लाइनचा
वापर करावा असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या ई-क्लासचा उपयोग
अधिकाऱ्यांना अद्ययावत माहिती मिळण्यासाठी करता येईल.

प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यांना ई- अकॅडमीच्या ई शिक्षण प्रणालीमध्ये
नियमित प्रशिक्षण मॉड्युल, सेवांतर्गत प्रशिक्षण मॉड्युल, पोलिस स्टेशन
मॅनेजमेंट मॉड्युल आदी प्रमुख विभाग करण्यात आले आहेत. या माध्यमातून
कायदेविषयक पोलिस नियमावली, गुन्हे प्रतिबंध, सायबर क्राइम, आर्थिक
गुन्हे, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था, मानवी वर्तणुक यांचे उदाहरणांसह
शिक्षण देण्यासाठी उपयोग होणार आहे. टॅब, लॅपटॉप, संगणक व मोबाईल फोन्स
या आधुनिक साधनांच्या माध्यमातून डिजीटल तंत्राचा परिणामकारक वापर या
ई-लर्निंगसाठी करण्यात येईल.