२ कोटी वृक्ष लागवड वृक्ष लागवड कार्यक्रम लोकचळवळ म्हणून राबवा- डॉ.विजय सूर्यवंशी

0
23

गोंदिया,दि.८ : जागतिक तापमान वाढ व सातत्याने प्रदूषणात होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. उदभवणारी पूर परिस्थिती व दुष्काळ हे सुध्दा पर्यावरणाचा असमतोल बिघडण्यास कारणीभूत आहे. पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेसाठी येत्या १ जुलै रोजी करण्यात येणारा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्ह्यात लोकचळवळ म्हणून राबवा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
आज ८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतांना डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर व सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदिप बडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी बोलतांना पुढे म्हणाले, या वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत रोपे लावण्यासाठी १५ जून पर्यंत कोणत्याही परिस्थितीत यंत्रणांनी खड्डे तयार करावे. १० जून पर्यंत संबंधित यंत्रणेच्या सर्व समन्वयकांच्या मोबाईल सेटवर आवश्यक ते सॉफ्टवेअर अपलोड करावे. १ जुलैचा वृक्ष लागवड कार्यक्रम हा शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. कोणत्याही यंत्रणेने या कामात हलगर्जीपणा करु नये. अत्यंत काळजीपूर्वक वृक्ष लागवडीचा कार्यक्रम लोकांना सोबत घेऊन यशस्वी करावा.
वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत लावण्यात येणारे प्रत्येक झाड हे जीपीएस सिस्टीमवर अपलोड होणार असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, या कार्यक्रमासाठी लागणारा निधी, खड्डे व रोपांच्या अडचणीबाबत काही तक्रारी असल्यास तातडीने संपर्क साधावा. यंत्रणांनी या कार्यक्रमात मन लावून काम करावे. ज्या व्यक्तींकडे तसेच यंत्रणांकडे वृक्ष लागवडीसाठी जागा नसेल तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक असेल अशांनी सामाजिक वनीकरण विभागाशी संपर्क साधून गोंदिया जवळील कटंगीकला येथे वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे.
या कार्यक्रमात विविध यंत्रणांसह रुग्ण कल्याण समिती, शाळा व्यवस्थापन समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती यासह गाव पातळीवरील महिला बचतगटांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी करुन घ्यावे असेही जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी यंत्रणांना निर्देश दिले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, वृक्ष लागवड कार्यक्रमात खड्डयांची निर्मिती व रोपट्यांची आवश्यकता तसेच ज्या यंत्रणांना रोपट्यांची आवश्यकता भासणार आहे त्यांनी समन्वय साधून वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करावा.
डॉ.रामगावकर म्हणाले, वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक यंत्रणांनी आपल्या समन्वयकाची निवड करावी. विभागांना दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. यंत्रणांनीच रोप वाटिकेतून ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करावयाची आहे त्या ठिकाणापर्यंत रोपांची वाहतूक करावी. रोपांचे दर, रोपट्यांच्या जाती व रोपवाटिकेचे ठिकाण यंत्रणेसाठी निश्चित करण्यात येतील. संबंधित रोपवाटिकेच्या प्रभारी अधिकाऱ्याशी यंत्रणांनी समन्वय साधावा असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत ९ लाख ७२ हजार विविध जातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील कुडवा- २५ हजार, गोंडमोहाडी- २० हजार ७७२, किकरीपार- १० हजार, देवरी- ३७६२, भागी- १५ हजार, डव्वा- ११ हजार ३७५, निमगाव- ३० हजार ७००, मालकनपूर- ५० हजार, मुरदोली- ५० हजार इतकी रोपटी रोपवाटिकेत वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदिप बडगे यांनी यावेळी दिली.
सभेला उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.डी.शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, जिल्हा क्रिडा अधिकारी अशोक गिरी, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.जी.नौकरकर, जि.प.च्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.पथाडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री.गरड, जि.प.चे कार्यकारी अभियंता एस.व्ही.खांडरे, गटविकास अधिकारी (रोहयो) जी.एम.खोब्रागडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.जे.एम.कुरडवार, गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी के.डी.मेश्राम, सामाजिक वनीकरणचे लागवड अधिकारी युवराज कुंभलकर, जिल्हा न्यायालयाचे एस.टी.सोहळे, जिल्हा उद्योग केंद्राचे बी.एम.शिवणकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जी.बी.नावळे, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सी.बी.येळेकर, न.प.गोंदियाचे नूतन कोरडे, पोलीस विभागाचे वाय.के.गिरी, समाजकल्याण विभागाच्या प्रतिनिधी प्रा.संगिता घोष, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.