१९१ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

0
20

मुबंई,दि.13- नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या १९१ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज मुंबई येथे दिली.नोंदणी रद्द केलेल्यांमध्ये असदुद्दिन ओवैसी यांच्या एआयएमआयएम या पक्षाचा देखील समावेश आहे.सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याला आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य असते. त्याचबरोबर सर्व उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध व्हावी; तसेच बाहुबळाचा वापर व आर्थिक बळाचा दुरुपयोग होऊ नये, या उद्देशाने ‘राजकीय पक्ष नोंदणी आदेश, २००४ व २००९ आणि ‘महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २००९ नुसार राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी चिन्ह वाटपात प्राधान्य दिले जाते.
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व ३४२ अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. या पक्षांना नोंदणी आदेशानुसार आयकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण ३२६ राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही विहित मुदतीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यापैकी १९१ पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सहारिया यांनी सांगितले.