सेंट पीटर्सबर्ग-महाराष्ट्रादरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

0
6

मुंबई, दि. 13 : रशिया दौऱ्यावर असणारे महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर जॉर्जी
पोल्तॉवचेंको यांनी पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रियाविषयक
महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार सेंट
पीटर्सबर्गकडून यासंदर्भात तांत्रिक आणि इतर धोरणात्मक स्वरुपाचे सहकार्य
राज्याला लाभणार आहे.

पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया क्षेत्रात सेंट
पीटर्सबर्ग प्रांतात लक्षणीय आणि पथदर्शी काम झाले आहे. येथील वोडोकॅनाल
संस्थेचे त्यात मोठे योगदान असून या संस्थेकडे पाणी पुरवठ्यासाठी 7100
कि.मी. लांबीचे स्वत:चे जाळे आहे. सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी 9
प्लांट असून प्रतिदिन 16 लक्ष घनमीटर पेयजल या संस्थेकडून पुरविण्यात
येते. राज्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनेसाठी
वोडोकॅनाल तांत्रिक आणि इतर स्वरुपाचेही सहकार्य करणार आहे. त्यासोबतच
मुंबईतील मिठी नदीसह इतर नद्यांच्या शुद्धीकरणासाठीही या संस्थेची मदत
होणार आहे. महाराष्ट्र आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान झालेल्या या
सामंजस्य करारानुसार दोन्ही राज्यात संयुक्त कृती गट स्थापन करण्यात
येणार असून प्रस्तावित सहकार्य करण्याबाबतचा एक आराखडा निश्चित करण्यात
येणार आहे. त्यासाठी एक विहित कालमर्यादाही ठरविण्यात येणार आहे.

सेंट पीटर्सबर्गने या करारासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत आणि
महाराष्ट्रासाठी विविध क्षेत्रात सहकार्याची तयारी दाखविल्याबद्दल श्री.
फडणवीस यांनी गव्हर्नर पोल्तॉवचेंको यांचे विशेष आभार मानले. या
करारासोबतच नगरविकास, स्मार्टसिटीची उभारणी, जहाजबांधणी, माहिती
तंत्रज्ञान, उच्चशिक्षण आदींबाबतही सेंट पीटर्सबर्गकडून महाराष्ट्राला
सहकार्य करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या करारावर कालच स्वाक्षरी करण्यात
आली होती. दरम्यान, श्री. फडणवीस यांनी आज आपल्या रशिया दौऱ्याच्या
अखेरच्या टप्प्यात सेंट पीटर्सबर्ग येथील जगप्रसिद्ध हर्मिटेज
वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. हे वस्तूसंग्रहालय आणि मुंबई
महापालिकेदरम्यान कालच एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
त्यानुसार कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी हर्मिटेजकडून महापालिकेस
सहकार्य करण्यात येणार आहे.