आंबेडकर भवन पाडल्‍याचा निषेध, मुंबईत हजारो भिमसैनिक

0
10

मुंबई- दादर येथील डॉ. आंबेडकर भवन बेकायदेशीररित्या जमीनदोस्त केल्याबद्दल ट्रस्टच्या सहा विश्‍वस्ताविरूध्द गुन्हा दाखल होवूनही कायदेशीर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ विधान- भवनावर महामोर्चा निघाला आहे. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले असून, शासनाविरोधात रोष व्‍यक्‍त केला जात आहे. मुंबईत पाऊस सुरू असून पावसात छत्र्या घेऊन आंदोलक मोर्चात सहभागी झालेे आहेत.
राज्‍यातील विविध जिल्‍ह्यातील भिमसैनिक या मोर्चासाठी मुंबईमध्‍ये दाखल झाले आहेत. भवन पाडणा-यांना तत्‍काळ अटक करा अशी मागणी लोक करत आहेत. औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नगरसह राज्‍यभरातून लोक या मोर्चासाठी मुंबईत दाखल झालेत. पुुण्‍यातून महामोर्चासाठी पाच हजार भिमसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रामहरी ओव्हाळ व सम्यक विद्यार्थी आंदोलन पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संघटक नवनीत अहिरे यांनी दिली आहे. विविध दलित संघटना या मोर्चात सहभागी झाल्‍या आहेत.
आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ऐतिहासिक वास्तूमधून 1947 साली बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस सुरू केली त्या दादरमधील डॉ. आंबेडकर भवनावर 24 जूनच्‍या मध्यरात्री बुलडोझर फिरवण्यात आला. दोन बुलडोझर आणि पाचशे ते सहाशे सुरक्षारक्षकांचे बळ वापरून ही कारवाई करण्यात आली. या घटनेच्‍या सुत्रधारांना अटक करा अशी मागणी महामोर्चातून होत आहे.

आंबेडकर भवन प्रकरणात मुख्‍यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्‍यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई होण्‍याची शक्‍यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.