वर्धा नदीत रिक्षा कोसळून तिघांना जलसमाधी?

0
8

यवतमाळ,दि.19- रिक्षाचे समोरील चाक पंक्‍चर झाल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून धावती रिक्षा कठडे नसलेल्या पुलावरून वर्धा नदीत कोसळली. त्यात वरोरा (जि. चंद्रपूर) येथील तीन युवकांना जलसमाधी मिळाली. ही दुर्दैवी घटना आज (मंगळवार) सकाळी आडेआठच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील सोईट कोसाराजवळील वर्धा नदी पुलावर घडली.

वरोरा (जि. चंद्रपूर) येथील कासमपंजा वॉर्डातील नाजीम अख्तर रसूल शेख (वय 30), शाहरुख शेख (वय 23), इमरान शेख (वय 21) अशी वर्धा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या युवकांची नाव आहेत. हे तिघेही रिक्षाने (क्रमांक एमएच 24 डी 6419) वरोरा येथून यवतमाळ जिल्ह्यातील कोसारा खैरीकडे जात होते. सोईटकोसारा शिवारात असलेल्या वर्धा नदीच्या पुलावर धावत्या रिक्षाचे समोरील चाक पंक्‍चर झाल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटून वाहनासह तिघेही वर्धा नदीत कोसळले. या घटनेदरम्यान कोसारा येथील मदतीची याचना करीत असताना पाण्याच्या प्रवाहात बुडत होते. मात्र, अशा विदारक व गंभीर परिस्थितीत मदत अशक्‍य असल्याने तीनही युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मारेगाव व वरोरा प्रशासनास कळताच मारेगावचे तहसीलदार विजय साळवे, ठाणेदार संजय शिरभाते, वरोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रताप पवार, एसडीओ लोंढे, पोलिस निरीक्षक विलास चव्हाण घटनास्थळी दाखल झाले आहेत. आपत्कालीन बचतकार्य तथा शोध पथकाला पाचारण करून नदीत बुडालेल्या युवकांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, नदीत पडलेल्या रिक्षाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.