निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करणार-पांडुरंग फुंडकर

0
6

मुंबई, दि. 22 : निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या कंपन्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा केल्या संदर्भातील प्रश्न विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, दीपक चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. श्री. फुंडकर यावेळी म्हणाले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीपरणे उभे आहे. निकृष्ट बियाणे पुरविणाऱ्या दहा कंपन्यांबाबत राज्य शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांची तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीअंती दोषी
कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच केंद्राच्या बियाणे कायद्यात योग्य ते बदल करण्यासाठी राज्याला अधिकार मिळावेत याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही श्री. फुंडकर यांनी स्पष्ट केले.