शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटीद्वारे जमीन संपादित करा- मुख्यमंत्री

0
10

अहमदनगर-बीड-परळी आणि वर्धा – नांदेड – यवतमाळ रेल्वे मार्ग

मुंबई, दि. 22: अहमदनगर-बीड-परळी आणि वर्धा -नांदेड-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटी करून जमीन संपादित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले.

राज्यातील विविध सिंचन, रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला आणि जमीन संपादन, विस्थापन आणि प्रकल्पांच्या कार्यान्वयाबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. बैठकीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्यासह विविध विभागाचे प्रधान सचिव, सचिव, एमएमआरडीएचे अधिकारी आदी उपस्थित होते. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री. फडणवीस यांनी संवाद साधला. राज्यातील सिंचनाखाली येणाऱ्या क्षेत्रात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना तातडीने पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सिंचन प्रकल्पांच्या कामावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
आज झालेल्या बैठकीत गोसेखुर्द, बेंबळा, लोअर वर्धा प्रकल्पांच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी शासनस्तरावर येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील असे सांगतानाच केवळ प्रशासकीय कामांमुळे कामे रखडू नयेत तसेच जमीन संपादन, बाधित नागरिकांचे विस्थापन, त्यांना दिला जाणारा मोबदला यासंदर्भात अधिकाऱ्यांनी गतीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच भंडारा, नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना जमीन संपादनाबाबत पुढील आठवड्यात बैठका घेण्याचे आदेश दिले.
याचबरोबर नागपूर व मुंबई मेट्रो मार्गासह अहमदनगर-बीड-परळी आणि वर्धा-नांदेड-यवतमाळ या रेल्वे मार्गाच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. रेल्वे प्रकल्पांना लागणाऱ्या जमिनींचे संपादन रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने तातडीने करावे आणि त्यासाठी वारंवार बैठका घेण्याची गरज भासू देऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.